जळकोट : प्रतिनिधी
जळकोट येथे शासनाने तब्बल साडेचार कोटी रुपये खर्चून नवीन टोले जंग बसस्थानक उभारले आहे मात्र या बसस्थानकामध्ये बसण्यास प्रवाशांना मनाई करण्यात आली आहे . यामुळे प्रवाशांना जुन्या असलेल्या गळक्या बसस्थानकामध्येच भिजत थांबण्याची वेळ आली आहे जळकोट येथे अनेक वर्षापासून बस स्थानकाचे काम सुरू आहे.आता या बस स्थानकाचे कामही पूर्ण झाले आहे. रंगरंगोटी झाली आहे फलक लावण्यात आलेले आहेत. प्रवाशांना बसण्यासाठी बँच बसविण्यात आले आहेत. कंट्रोलरसाठीही विशेष रूमची व्यवस्था करण्यात आली आहे मात्र नवीन बस स्थानकामध्ये प्रवाशांना बसण्यास मनाई करण्यात आली आहे. सध्या बसस्थानक इमारतीच्या समोरच्या बाजूला कुठलाही प्रवासी आत जाऊ नये म्हणून लाकडाचे बॅरिकेट बसविण्यात आले आहेत . समोरच्या बाजूकडून आणि मागच्या बाजूकडून दोन्ही बाजूकडून बॅरिकेट लावण्यात आलेले आहेत. यामुळे प्रवाशांना नवीन बस स्थानकामध्ये बसण्यास अडचण निर्माण झाली आहे .
जळकोटचे जुने बस स्थानक आहे ते खूप वर्षांपूर्वी बांधलेले आहे. हे बस स्थानकास पाऊस पडल्यानंतर गळती लागत आहे. यामुळे या गळक्या बस स्थानकात भिजत प्रवाशांना थांबावे लागत आहे. नवीन बस स्थानकामध्ये प्रवाशांना थांबण्याची सोय करून दिली तर परिवहन विभागाची बिघडते कोठे असा प्रश्नही उपस्थित होत आहे. बसस्थानके प्रवाशांच्या सोयीसाठी आहे का कशासाठी हा प्रश्नही उपस्थित होत आहे. नवीन बस स्थानक तयार आहे त्यामुळे उद्घाटन होईल तेंव्हा होईल प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून परिवहन महामंडळाने तात्काळ नवीन इमारतीमध्ये प्रवाशांना बसण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशाकडून केली जात आहे.
















