लातूर : प्रतिनिधी
नीट-२०२६ परीक्षेचा पेपर फुटीप्रकरणी आणि केंद्र सरकारच्या विविध घोटाळ्यांच्या निषेधार्थ लातूर जिल्हा युवक काँग्रेस व लातूर शहर जिल्हा युवक काँग्रेस तसेच लातूर जिल्हा विद्यार्थी काँगे्रस (एनएसयूआय) यांच्या वतीने दि. १६ मे रोजी सकाळी ११ वाजता येथील ट्युशन एरियातील अर्बन बँकेसमोर जवाब दो… आंदोलन करीत तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी जवाब दो…. जवाब दो…, भारत सरकार जवाब दो…, या व अशा घोषणांनी ट्युशन एरिया दणाणुन गेला.
यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निलेश देशमुख, युवक काँगे्रेसचे शहराध्यक्ष विष्णूदास धायगुडे, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहीत बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ‘लातूर पॅटर्न’निर्मितीत शिक्षण क्षेत्रतील असंख्य मान्यवरांचे योगदान आहे, असे नमुद करुन खासदार डॉ. शिवाजी काळगे यावेळी म्हणाले, शिक्षणाचा बाजार मांडून स्वार्थासाठी कोणी लातूरची गुणवत्ता वेठीस धरणार असेल तर खपवून घेतले जाणार नाही. काँग्रेस पक्ष सदैव विद्यार्थ्यांच्या आडीअडचणीत मदतीला धावून आलेला आहे. आजही आम्ही सर्वजन विद्यार्थ्यांसोबत आहोत. यावेळी शिवराज मोरे म्हणाले, देशाचे पंप्रधान नरेंद्र मोेदी, त्यांची शैक्षणिक पात्रका काय?, याचा विचार केला तर नीट पेपर फुटीची प्रकरणे घडणारच. ५ वर्षांत ६५ वेळा विविध परीक्षांचे पेपर लिक झाले आहेत. देशाला संवेदनशील सरकारची गरज आहे. दुर्दैवाने मोदींचे सरकार संवेदनशील नाही.
अभय साळुंके म्हणाले, देशातील २२ लाख विद्यार्थ्यांनी कष्ट, त्याग करुन नीटची परीक्षा दिली. त्यांना त्यांच्या पालकांनीही मोलाची साथ दिली आणि केवळ स्वार्थापोटी काहींनी पेपर फोडुन २२ लाख विद्यार्थ्यांच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नांचा चुराडा केला. याची जबाबदारी स्वीकारुन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करुन जवाब दो…जवाब दो… भारत सरकार जवाब दो…, इस्तिफा दो…इस्तिफा दो…., अशा घोषणा दिल्या. यावेळी अॅड. किरण जाधव यांनीही आपले विचार मांडताना अतिश्य तीव्र शब्दात नीट परीक्षा पेपर फुटीचा निषेध केला. नीटची परीक्षा आता २१ जून रोजी होणार आहे. या वाढीव कालावधीची फिस क्लासेस चालकांनी विद्यार्थ्यांकडुन घेऊ नये, असे आवाहन केले.
या आंदोलनात नगरसेवक प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर, माजी उपमहापौर कैलास कांबळे, लातूर शहर महानगरपालिका परिवहन समितीचे सभापती फैसलखान कायमखानी, प्रविण सूर्यवंशी, प्रा. प्रविण कांबळे, पिराजी साठे, मनोज चिखले, राम स्वामी यांच्यासह युवक काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी, विधानसभा अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष तसेच सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
















