बीजिंग : वृत्तसंस्था
चीनने सोन्याच्या विक्रीवरील दीर्घकाळापासून असलेली कर सवलत रद्द केली आहे. त्यामुळे सोन्यातील दरात पुन्हा एकदा दरवाढीचा भडका उडण्याची भीती निर्माण झाली आहे. हा निर्णय आजपासून लागू झाला. चीनच्या निर्णयामुळे किरकोळ विक्रीचा खर्च वाढेल. मुळात जागतिक सोन्याच्या बाजारपेठेवर चीनचा प्रभाव आहे. त्यामुळे जगातील सर्वांत मोठ्या बाजारपेठांपैकी चीनमध्ये सोने खरेदी करणे अधिक महाग होऊ शकते. तसेच या धोरणाचे व्यापक परिणाम होऊ शकतात, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
चीनने सोन्यावरील कर सवलत संपवण्याचा निर्णय घेतला आहे. ही सवलत दीर्घकाळापासून सुरू होती. चीनच्या अर्थमंत्रालयाने जारी केलेल्या नियमानुसार आता सोने खरेदी करणा-या किरकोळ विक्रेत्यांना शांघाय गोल्ड एक्सचेंजमधून खरेदी केलेल्या सोन्याच्या विक्रीवर सूट मिळणार नाही. मग ते सोने थेट विकले गेले असो किंवा प्रक्रिया केल्यानंतर मूल्यवर्धित करात (व्हॅट) सूट किंवा अडजस्टमेन्ट आता मिळू शकणार नाही.
चिनी रिअल इस्टेट बाजारात मंदी आणि आर्थिक विकासावर दबाव असताना चीनच्या अर्थमंत्रालयाने सोन्याच्या खरेदीवरील व्हॅट सवलती काढून टाकण्याचा निर्णय घेतला. यामुळे सरकारी महसुलाला मोठा धक्का बसला असून आता सोन्यावरील व्हॅट सवलती काढून टाकल्याने सरकारी महसूल वाढू शकतो. मात्र, या बदलामुळे चिनी ग्राहकांसाठी सोने खरेदी अधिक महाग होणार आहे. याचा भारतावरही परिणाम होणार आहे.
चीनने सोन्यावरील व्हॅट प्रोत्साहन रद्द केल्यामुळे चिनी नागरिकांना सोने खरेदी आधीपेक्षा जास्त महाग होईल. जागतिक पातळीवर सोन्याच्या दरात जोरदार उलथापालथ सुरू आहे. आधीच गुंतवणूकदारांमधील या खरेदीच्या जोरामुळे सोन्याच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या. नंतर नफा वसुलीसाठी किमती घसरल्या. परंतु पुन्हा या किमती वाढू शकतात. मागील काही दिवसांतील सोन्याच्या किमतीत झालेली सुधारणा किंवा घट ही १० वर्षांहून अधिक काळातील सर्वात मोठी होती.
भारतातील किमतीवर
आता थेट परिणाम?
सोन्याच्या विक्रीवरील सवलती बंद करण्याच्या चीनच्या निर्णयाचा थेट परिणाम भारतावर होऊ शकतो. भारत आणि चीन हे देश जगातील सर्वांत मोठे सोन्याचे ग्राहक आहेत. चीनच्या बाजारपेठेत होणारे कोणतेही बदल जागतिक सोन्याच्या किमती आणि व्यापाराच्या उलाढालीवर परिणाम करू शकतात. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम भारतावर होऊ शकतो.

