अहमदपूर : प्रतिनिधी
सद्य: स्थितीत समाजातील तरुण दिशाहीन बनला असून तो सोशल मीडियाकडे ओढला गेल्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ग्रामीण भागातील तरुणांना साहित्य माहीत व्हावे, या हेतूने ग्रामीण भागात ‘जागल’ एक दिवसीय साहित्य संमेलनात सहभागी होऊन मराठी साहित्याविषयी रुची वाढेल, असे आग्रही प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांनी केले.
किनी कदू येथील ‘बसवसृष्टी’, ‘संविधान पार्क’ येथे आयोजित चौथे ‘जागल’एक दिवसीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ४५ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कवी, कादंबरीकार प्रा.फ.म. शहाजिंदे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, स्वागताध्यक्ष तथा किनी कदूचे माजी सरपंच संजय पाटील, निमंत्रक राजश्री शाहू महाविद्यालयाचे प्रा. डॉ.भीमराव पाटील, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष सत्यनारायण काळे, कार्याध्यक्ष प्रा.द.मा.माने, ब्रह्मा पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी यांचे स्वागताध्यक्ष संजय पाटील आणि निमंत्रक प्रा. डॉ. भीमराव पाटील यांची मनोगत पर भाषणे झाली. ‘जागल’ एकदिवसीय मराठी साहित्य संमेलनप्रसंगी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
४५ वे मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कवी प्रा.फ.म.शहाजिंदे म्हणाले की , सद्य:स्थितीस मराठीची स्थिती महाराष्ट्रात गंभीर असून महाराष्ट्रातील ६६ हजार प्राथमिक शाळा बंद पडलेल्या आहेत. आज ग्रामीण भागातील मुले कॉन्व्हेंटमध्ये जात आहेत. हे चिंतन असल्याचे सांगून आणि सर्व क्षेत्रांमध्ये मराठीमध्ये शिक्षण घेतलेल्या मुलांनी अटकेपार झेंडा रोवण्याचे काम मराठी शाळेतील मुलांनीच केले असल्याचेही नमूद केले.
प्रास्ताविक सत्यनारायण काळे यांनी, सूत्रसंचालन राम तत्तापुरे व आशा रोडगे-तत्तापुरे यांनी केले तर आभार कार्याध्यक्ष प्रा.द.मा.माने यांनी मानले. या सोहळ्यास महेश बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, मोहिब कादरी, उपाध्यक्ष महेंद्र खंडागळे, जिलानी शेख, कार्यकारी नगरसेवक प्रशांत भोसले, प्रा. डॉ. नानासाहेब सूर्यवंशी, शिवाजी जाधव, कवी बालाजी मुंडे, प्रा. निशिकांत देशपांडे , ज्ञानोबा भोसले, गंगाधर याचवाड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
दुपारच्या सत्रात ‘समाज बांधणीतील संतांचे योगदान’ या विषयावर परिसंवाद प्रा.डॉ.अनिल मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. त्यात प्राचार्य डॉ. चंद्रशेखर कळसे यांचे ‘संत नामदेव’ यांच्या जीवनावर प्रा. डॉ. विजयकुमार करजकर यांचे ‘महात्मा बसवेश्वर’यांच्या जीवनावर प्रा. डॉ. दत्ताहरी होनराव यांचे संत चोखामेळा यांच्या जीवनावर प्रा. डॉ. ह.भ. प. हरिदास तम्मेवार यांचे संत तुकाराम महाराज आणि समाज प्रबोधन यांच्यावर प्रा. डॉ. बालाजी भंडारे यांचे ‘संत सावता माळी’ यांच्या जीवनावर तर सुरेंद्र स्वामी यांचे ‘संत ज्ञानेश्वर’ यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला. तिस-या सत्रात, तीन भागात बहारदार काव्यसंमेलन कवी योगीराज माने यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात घेण्यात आले.

