लातूर : प्रतिनिधी
शहर परिसरात जमीन, प्लॉटवर अवैधरित्या कब्जा करून त्या जमिनी इतरांना विक्री करण्याचा प्रयत्न होत आहे. आपल्याच भावाच्या पाखरसांगवी परिसरातील प्लॉटवर असा प्रयत्न झाला असून या प्रकरणी ९ आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती देत या प्रकरणी पालकमंत्री, मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष राजा मणियार यांनी बुधवारी लातुरात पत्रकारांशी बोलताना सांगीतले.
प्लॉटचे कंपाउंड तोडून जबरदस्तीने वॉचमनला मारहाण करून हा गंभीर प्रकार घडल्याने यावरून आता लातूरमध्ये लॉट घेणे सामान्यांसाठी जिकिरीचे बनल्याचे दिसून येत असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. अब्दुल गफार बद्दल रशीद मणियार यांच्या मालकीचे ६ प्लॉट पाखरसांगवी येथील गट क्रमांक ७७ मध्ये आहेत. या प्लॉटवर हाफिज शेख, रहेमतुल्ला शेख, बशीर शेख, विजय मस्के, सचिन देशमुख, गोपाळ लवटे, सतीश मानकुसकर यांनी कब्जा करण्याचा प्रयत्न केला. या मंडळींनी बनावट खरेदीखताद्वारे मौजे वरवंटी ता. लातूर येथील गट क्रं . ८५ च्या सातबाराच्या आधारे खोट्या व पाखरसांगवीमधील जमीन गट क्रं . ७७ चतु:सीमा भासवून ही जमीन या मंडळींना विक्री केल्याची तक्रार एमआयडीसी पोलिसात दिली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तरीही या मंडळींकडून आपल्याला व आपल्या परिवाराला धोका असल्याची भीती राजा मणियार यांनी व्यक्त केली. आरोपींनी प्लॉटवरील सीसीटीव्ही कॅमेरे फोडले असून तेथील साहित्यही लंपास केले आहे. त्यानंतर आपण पोलीस अधीक्षकांशी बोललो, तेव्हा त्यांनी याप्रकरणी तुमच्या प्लॉटवर कोणी कब्जा करणार नाही, असा शब्द दिला. याविषयी पोलिसात गुन्हाही नोंद केला गेला आहे. याप्रकरणी आपल्यावर खोटी अट्रॉसिटी दाखल होऊ शकते, आपल्यावर विनयभंगाची खोटी तक्रारही दाखल केली जाऊ शकते, अशी भीती राजा मणियार यांनी व्यक्त केली आहे. याप्रसंगी गफार मणियार, शेळके, सिद्धेश्वर बिराजदार, प्रवीण साळुंके, चंद्रशेखर कत्ते, निशांत वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती
होती.
















