लातूर : प्रतिनिधी
राज्यातील खाजगी साखर उद्योगात मराठवाडा आणि विदर्भ राज्यात ऊस उत्पादक शेतक-यांना एफ. आर. पी. पेक्षा अधिक भाव देणा-या देवणी तालुक्यातील तळेगाव (भो.) येथील जागृती शुगर अँड अलाईंड इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्याकडून २०२५- २०२६ मध्ये गाळपास आलेल्या ऊसासाठी एफ. आर. पी. च्या अंतिम हप्त्यापोटी प्रती मेट्रिक टन ३१२.१६ रुपये ऊसाची रक्कम शेतक-यांच्या खात्यावर दि. ११ जून रोजी वर्ग करण्यात आली. त्यामुळे ऊस उत्पादक शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जागृती शुगरने शेतक-यांना अधिक भाव देण्याची परंपरा कायम राखली आहे. त्याबद्दल कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, कारखान्याच्या चेअरमन तथा कार्यकारी संचालक सौ. गौरवीताई अतुलजी भोसले (देशमुख) यांचे उस उत्पादक शेतकरी यांचेकडून कौतुक होत आहे
६ लाख ६४ हजार मेट्रिक टन ऊसाचे विक्रमी गाळप
राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी तथा कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या अध्यक्षा सौ. गौरवीताई अतुलजी भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली कारखान्याने २०२५-२६ गाळप हंगामात कारखान्याने ६ लाख ५४ हजार ८ मेट्रिक टन ऊस गाळप करून ६ लाख ९० हजार ५०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. बी हेविसह सरासरी साखर उतारा १२.००४ टक्के मिळालेला असून कारखान्याने आजपर्यंत २ कोटी ५२ हजार युनिट वीज निर्यात केली असून आघाडी घेतली आहे.
राज्य शासनाच्या १५ एप्रिल २०२५ च्या शासन निर्णयानुसार मागील हंगामाचा अंतिम साखर उतारा आणि ऊसतोड वाहतूक खर्च विचारात घेऊन एफआरपी निश्चित करण्यात आली असून त्यानुसार जागृति शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड चा अंतीम भाव ३१६२.१६ रूपये प्रति मेट्रिक टन निश्चित केला आहे यापूर्वी कारखान्याकडून ऊस उत्पादक पुरवठा शेतक-यांना २८५० रुपये प्रति मेट्रिक टन दराप्रमाणे ऊस बिल अदा केले आहेत उर्वरीत ३१२.१६ रूपये प्रति मेट्रिक टन ऊसाची रक्कम ११ जून रोजी खात्यावर जमा देण्यात आले असून संबधित ऊस पुरवठा शेतक-यांनी नजीकच्या बँक खात्यावरील बिलाची रक्कम घ्यावी, असे आवाहन उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, सरव्यवस्थापक गणेश येवले यांनी केले आहे.
















