लातूर : प्रतिनिधी
येथील जात पडताळणी कार्यालयात कुणबी तसेच एसईबीसी प्रमाणपत्रासाठी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची अडवणूक व आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप करीत हे प्रकार बंद करावेत व मराठा विद्यार्थ्यांना विनाव्यत्यय प्रमाणपत्र दयावेत, या मागणीसाठी चार मराठा आंदोलकांनी चक्क येथील मार्केड यार्ड परिसरात असलेल्या समाजिक न्याय भवनाच्या इमारतीवर चढून दि. २ सप्टेंबर रोजी लक्षवेधी आंदोलन केले. तब्बल ४ तास सुरू असलेले हे आंदोलन संबधीत विभागाने मागण्यांची पुर्तता करण्याची लेखी हमी दिल्यानंतर मागे घेण्यात आले.
बुधवारी कोणालाही कल्पना न देता बालाजी जाधव, खंडू लोखंडे, आदित्य जगदाळे व वैशाली लोंढे हे ४ आंदोलक मार्केट यार्ड परिसरातील सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीवर चढले. त्यांनी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करीत मराठा विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळविताना होत असलेल्या अडचणींचा निषेध केला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. गांधी चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रेजीतवाड व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांना खाली उतरण्याची विनंती केली. चर्चेतून प्रश्न मार्गी लागतील, असे पोलिसांनी सांगितले. मात्र, मागण्या मान्य होईपर्यंत खाली उतरणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली.
ाराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या कुणबी प्रमाणपत्रांच्या जात वैधता प्रमाणपत्रांचा निपटारा लवकरात लवकर करावा, कोणताही आर्थिक व्यवहार न करता पारदर्शकपणे जात वैधता प्रमाणपत्रे द्यावीत, विद्यार्थ्यांना प्राव्हिजनल (तात्पुरती) कागदपत्रे तातडीने उपलब्ध करून द्यावीत तसेच एसईबीसी जात वैधता प्रमाणपत्रे तत्काळ देण्यात यावीत, अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या. दरम्यान, मराठा समाजाचे वैजनाथ जाधव, अॅड. उदय गवारे यांच्यासह अन्य पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून संबंधित अधिकारी मागण्यांबाबत लेखी पत्र देतील, असे सांगितले. त्यानंतर समितीने सकारात्मक भूमिका घेत वरील चारही मागण्यांच्या अनुषंगाने नियमानुसार तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, अशी लेखी हमी दिली. त्यानंतर आंदोलक इमारतीवरून खाली उतरले.
















