निलंगा : प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना निलंगा मतदारसंघातील महादेव कोळी समाजाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात महादेव कोळी जातीचे प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे कर्नाटक राज्यात रहिवासी करण्यासाठी परवानगी मागीतली आहे. याबाबतचे निवेदन उपजिल्हाअधिकारी निलंगा यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे.
सकल आदिवासी कोळी, महादेव मल्हार कोळी समाज संघटनेच्या वतीने सुलभतेने जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, रक्त नात्यातील व्यक्तीला वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत परिपत्रक काढावे, १९५० पूर्वी कोळी नोंदी असलेल्या व्यक्तींना त्या आधारावर जात प्रमाणपत्र निर्गमित करावे यासह निर्गिमउतारा, टीसी, वडिलांचे जात प्रमाणपत्र, ३६ अ च्या नोंदी नुसार जात प्रमाणपत्र निर्गिमत करावे यासह विविध मागणीसाठी दि. २१ जुलैपासून म्हणजेच गेल्या चार दिवसांपासून उपविभागीय अधिकारी निलंगा येथे अन्नत्याग उपोषण सुरु केले असून या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. या उपोषणाला विविध सामाजिक संघटना व पक्षाच्या वतीने पाठिंबा दिला आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाले आहेत परंतु आम्हाला जात प्रमाणपत्रासाठी अजूनही झगडावे लागत आहे. यामुळे आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आमचे पूर्वज कोळी महादेव असून आमच्या पूर्वजांच्या कागदपत्रावर अज्ञानपणामुळे कोळी असल्याच्या नोंदी आहेत तर काही लोकांच्या जुन्या नोंदी कोळी महादेव आहेत अनेकांच्या घरांमध्ये वैधता असतानाही हे प्रशासनामध्ये बसलेले अधिकारी आम्हाला जाणीवपूर्वक त्रास देत असून आमचे शैक्षणिक नुकसान करीत आहेत. असा आरोप करीत प्रशासनामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना निवेदन दिले आहे. या निवेदनावर निलंगा मतदारसंघातील निलंगा, देवणी, शिरूर अनंतपाळ येथील शालेय विद्यार्थ्यांच्या स्वक्ष-या आहेत.

