नाशिक : प्रतिनिधी
नाशिकमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जादूटोण्याची भीती दाखवत एका भोंदू बाबाने महिलेवर लैंगिक अत्याचार केले आहेत. धक्कादायक म्हणजे याशिवाय या पीडित महिलेकडून ५० लाख उकळण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिस ठाण्यात भोंदूबाबाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश जगताप असे या भोंदूबाबाचे नाव असून सदर घटना नाशिकमधील निफाडमध्ये घडली आहे. आरोपी हा स्वत:ला भोंदूबाबा म्हणवून घेतो. त्याने महिलेला तू मला आवडतेस, तुला मिळवण्यासाठी मी स्मशानात पूजा करतो, असे सांगून तिच्यावर मानसिक दबाव आणला. यानंतर त्याने एका पुस्तकात महिलेच्या पती आणि मुलांची नावे लिहिली आणि धमकावले की, माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले नाहीस तर पुस्तकातील नावांपैकी एकाचा बळी जाईल.
या जादूटोण्याच्या भीतीने घाबरलेल्या महिलेने आरोपीच्या सांगण्यानुसार अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले. याच दरम्यान, आरोपीने महिलेकडून ५० लाख रुपये उकळले आणि आर्थिक फसवणूक केली. यानंतर शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळलेल्या महिलेने पोलिस ठाणे गाठले.
पीडित महिलेने पोलिस ठाण्यात घडलेल्या प्रकरणाची तक्रार नोंदवली असून पोलिसांनी या प्रकरणी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपी गणेश जगताप याला अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले असून, त्याच्या साथीदारांचीही चौकशी सुरू आहे.

