जालना : प्रतिनिधी
जालन्यात दोन गटांमधील हाणामारी मिटवण्यासाठी गेलेल्या शिवसेना आमदाराने एका व्यक्तीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. अर्जुन खोतकर यांनी या व्यक्तीच्या कानाखाली मारली, त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी या व्यक्तीला चोप दिला. या घटनेचा व्हीडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जालना शहरातील बस स्थानक परिसरात दोन गटांत हाणामारी झाली. शिवसेना आमदार अर्जुन खोतकर पाहणी करत असताना दोन गटांत हाणामारी झाली. पावसाच्या पाण्यात लाकडी साहित्य वाहून गेल्यामुळे आणि जुन्या वादामुळे एकमेकांवर आरोप करत दोन गटांमध्ये मारामारी झाली. यामुळे घटनास्थळावर मोठी गर्दी झाली होती आणि वाहतूक कोंडी देखील झाली होती.
यावेळी अर्जुन खोतकर यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एक व्यक्ती जाब विचारत त्यांच्या दिशेने आला तर त्यांनी त्याच्या थोबाडीत मारली. अर्जुन खोतकर यांनी त्या व्यक्तीला मारल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील त्याला चोप दिला. घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी अर्जुन खोतकर यांचा हा व्हीडीओ काढला, जो सध्या जालन्यामध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
या घटनेनंतर अर्जुन खोतकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‘जमावाला पांगवण्यासाठी आणि वाद मिटवण्यासाठी मी मध्यस्थी केली. एकाला हटवण्यासाठी मला चापट मारावी लागली.’ अर्जुन खोतकर यांनी जमावाला शांत राहण्यास सांगितले. या घटनेमुळे घटनास्थळावर काही काळ तणावाचे वातावरण होते.
















