लातूर : प्रतिनिधी
जिल्हयात अतिवृष्टीच्या पावसाचा पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्त नागरिकांमध्ये कोणत्याही आरोग्य विषयक समस्या उद्भवू नयेत, याकरिता मंगळवार दि. ७ ऑक्टोबर पासून मोफत आरोग्य शिविरांचे आयोजन करण्यात येत आहे. संबंधीत गावातील व नजीकच्या पूरग्रस्त गावातील सर्व नागरिकांना या मोफत आरोग्य शिबिरांचा लाभ घेता येणार आहे.
या आरोग्य शिबिरात तज्ञ डॉक्टरांद्वारे वैद्यकीय सेवा दिली जाणार असून यात प्रामुख्याने स्त्रीरोग, बालरोग व विविध साथीच्या आजारांच्या अनुषंगाने तपासणी करण्यात येणार असून आवश्यक तो औषधोपचार दिला जाणार आहे. तसेच, पूर परिस्थितीमुळे नागरिकांची मानसिकता चिंतेत असण्याची शक्यता लक्षात घेऊन मानसोपचार देखील दिले जाणार आहे. यासह, पूरपरिस्थिती कमी झाल्यानंतर उद्भवणा-या विविध जलजन्य, किटकजन्य आजार व इतर आरोग्य विषयक आरोग्य शिक्षण देणारे प्रसिद्धी साहित्य शिबिर स्थळी लावण्यात येणार असून त्याद्वारे मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे.
या आरोग्य शिविरासाठी डॉक्टरांसह इतर मनुष्यबळ, राष्ट्रीय बालरोग स्वास्थ व जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाचे पथक, वैद्यकीय साहित्य सामग्री तसेच मुबलक प्रमाणात औपधीसाठा उपलब्ध ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी मोठया प्रमाणावर या मोफत आरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदिप ढेले व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

