चाकूर : प्रतिनिधी
राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरभरती प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि पात्र उमेदवारांना संधी मिळावी. यासाठी भरतीप्रक्रिया आता ऑनलाईन पद्धतीने करण्याचा राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याची माहिती सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.
सहकार मंत्री पाटील म्हणाले की, सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांनी तयार केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या परीक्षेसाठी नामांकित संस्थांमार्फत प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यामध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे कामकाज त्या जिल्हापुरते मर्यादित असल्याने त्या जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. बँकेच्या सेवेत येण्यासाठी उमेदवाराकडे संबंधित जिल्ह्यातील मूळ रहिवासी प्रमाणपत्र अथवा अधिका-प्रमाणपत्र असणे बंधनकारक असणार आहे.
यामध्ये ७० टक्के जागा त्या त्या जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात येणार असून उर्वरीत ३० टक्के जागा जिल्ह्याबाहेरील उमेदवारांसाठी खुल्या असतील. जिल्हा बँकांचे कार्यक्षेत्र त्या-त्या जिल्ह्यापुरते मर्यादीत असते आणि बँकांचे सर्व सभासद त्या जिल्ह्यातील असतात. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिल्यास ग्राहक,सभासद, ठेवीदार यांना चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकतील अशी माहिती पाटील यांनी दिली.

