निलंगा : प्रतिनिधी
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ४० वर्ष कार्य करून सहकारात भरारी घेत या प्रकरणात बँकेची कीर्ती देशपातळीवर गेली असून राज्यात केंद्रात भाजपची सत्ता असूनही उत्कृष्ट कार्याने बँकेला पुरस्काराने गौरवले जात असताना स्थानिक विरोधी नेत्यांना कळत नाही? असा टोला राज्याचे माजी मंत्री, सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांनी लगावला. जिल्हा बँक राज्यात एक नंबरवर घेऊन जाण्यासाठी मतदारांनी आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन राज्याचे माजी मंत्री, सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांनी केले. निलंगा येथील वृंदावन मंगल कार्यालयात निलंगा तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायटी, मजूर, पतसंस्था मत्स्य सभासद यांची संवाद बैठक शनिवारी आयोजित करण्यात आली होती त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी जिल्हा बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख, साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, बँकेचे संचालक अशोकराव पाटील निलंगेकर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव, संचालक अशोक गोविंदपूरकर, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक जयेश माने, पृथ्वीराज शिरसाठ, अनुप शेळके, राजकुमार पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभय साळुंखे, अजित माने, मधुकरराव पाटील, हल्लापा कोकणे, राजेंद्र सूर्यवंशी, अमित माने, हमीद शेख, बालाजी गोमचाळे, प्रा. राजकुमार जाधव, सचिन दाताळ, संभाजी सूळ, मोहनराव भंडारे, लाला पटेल, महेश देशमुख, शाहिद पटेल, डॉ अरविंद भातांब्रे, हरिराम कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
गेली ४० वर्षे देशमुख-निलंगेकर यांच्या ताब्यात जिल्हा बँक असल्याने सुरक्षित असल्याचे नमुद करून माजी मंत्री दिलीपराव देशमुख पुढे म्हणाले, बँकेत स्वर्गीय दिलीप पाटील निलंगेकर यांनी आमच्या सोबत कार्य केले आहे. आगामी निलंगा मतदारसंघातून संचालक कोण असणार याचा निर्णय अशोक पाटील निलंगेकर घेणार आहेत, असे सांगून निलंगावासीयांनी नकारात्मक भूमिका सोडून सकारात्मक भूमिकेकडे बघितले पाहिजे. आपली जिल्हा बँक ही राज्यात सहकार क्षेत्रातील एक नंबरवर घेऊन जाण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी आपला आशीर्वाद आगामी काळात होणा-या बँकेच्या निवडणुकीत आम्हाला द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
३५ वर्षे चेअरमन म्हणून इतरांना बँकेने संधी दिली
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी मागच्या ४० वर्षात केवळ ५ वर्षे मी चेअरमन म्हणून कार्य केले पुढे ३५ वर्षे इतरांना संधी देऊन विश्वास निर्माण केला, असे सांगून देशमुख यांच्या ताब्यात काही नाही तर लोकांचा विश्वास आहे. चेकवर सही चुकीची होणार आहे याकडे मात्र आमचे कायम लक्ष ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मराठवाडा-विदर्भात अधिक भाव देण्याचा मांजरा परिवाराचा प्रयत्न
सध्या निसर्ग शेतीला साथ देत नाही पाऊस नसल्याने शेतकरीराजा अडचणीत येत आहे; पण घाबरून जायचे काम नाही. आपली जिल्हा बँक आपल्या पाठीशी उभी आहे व मांजरा परिवारातील साखर कारखाने अधिकाधिक भाव देऊन शेतक-यांना मदत कशी करता येईल याकडे मी लक्ष देणार आहे, असे सांगून जिल्हा बँकेने पीक कर्ज वाटपात आघाडी घेत बँकेकडून शुभ मंगल योजना अंतर्गत आपल्यासाठी शून्य टक्के मुलीच्या लग्नासाठी कर्ज देणार आहे. विविध योजनेतून शेतक-यांना मदत केली आहे, भविष्यात करेल, असा विश्वास व्यक्त करून बँकेला स्थिर ठेवण्यासाठी शेतक-यांच्या विश्वासाला पात्र राहिलेली जिल्हा बँक आगामी काळातसुद्धा शेतक-यांचे कल्याण करण्यासाठी आशीर्वाद द्यावा, असे आवाहन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले.
जिल्हा बँकेची प्रगतीकडे वाटचाल
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गेल्या ४० वर्षापासून सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असून बँकेने राजकारण बाजूला ठेवून सर्वांना मदत केली असून सहकार क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. साखर कारखाने, जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतक-यांना न्याय दिला आहे त्यामुळे आदरणीय दिलीपराव देशमुख यांना पुण्यात नुकताच केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सहकारभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. जे चांगल आहे त्याला आपण विरोध न करता ही जागा बिनविरोध निवडून द्यावी, असे आवाहन जिल्हा बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांनी करत आगामी काळात जिल्हा बँक विविध योजनेच्या माध्यमातून शेतक-यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगून आगामी काळात होणा-या बँकेच्या निवडणुकीत मतदारांनी भरभरून आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन धिरज विलासराव देशमुख यांनी केले.
















