लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा रुग्णालयाला २०१३ च्या बृहत आराखड्यात मंजूरी मिळालेली आहे. जिल्हा रुग्णालयाला नांदेड रोडवरील कृषी विद्यापीठाची जागाही मिळालेली आहे. त्या जागेचे पैसेही शासनाने कृषी विद्यापीठाला दिलेले आहेत. आता जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारत बांधकामाला मंजूरी मिळणे अपेक्षीत असताना सोमवारी लातूर दौ-यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा रुग्णालयाला मान्यता दिल्याची घोषणा केली. १२ वर्षांपुर्वीच जिल्हा रुग्णालयाला मंजूरी मिळाल्यानंतर आता पुन्हा जिल्हा रुग्णालयाला ‘मान्यता’ म्हणजे नेमकं काय?, असा प्रश्न लातूरकरांना पडला आहे.
लातूरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाल्याने जिल्हा रुग्णालयाची जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास देण्यात आली. २०१३ साली जिल्हा रुग्णालयाला मंजूरी देण्यात आली. केवळ जागा मिळत नसल्याने जिल्हा रुग्णालयााचा प्रश्न प्रलंबीत राहिला होता. २०१९ मध्ये जिल्हा रुग्णालयाला नांदेड रोडवरील कृषी विद्यापीठाची जागा मिळाला. २०२४ मध्ये त्या जागेचे पैसेही मंजूर झाले. २०२५ मध्ये आरोग्य विभागाने कृषी विद्यापीठास त्या जागेचे पैसे देऊन जागाही ताब्यात घेतली आहे. एवढेच नव्हे तर त्या जागेचा ७/१२ ही झालेला आहे. आता जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारत बांधकामास सुरुवात करणे बाकी असताना राज्यातील आरोग्य विभागाची जी बांधकामे सुरु आहेत. ती पुर्ण होईपर्यंत नवीन इमारत बांधकाम सुरु करु नये, असा अध्यादेश शासनाने दि. २५ मे २०२५ रोजी काढला. या अध्यादेशामुळे लातूर जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारत बांधकामाची प्रक्रिया रखडली आहे.
शासनाच्या अध्यादेशामुळे लातूरच्या जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम रखडले असून शासनाने विशेषबाब म्हणून लातूरच्या जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामास परवानगी द्यावी, अशी लातूरकरांची मागणी असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा रुग्णालयाला ‘मान्यता’ दिली, अशी घोषणा सभेतच केल्यामुळे जिल्हा रुग्णालयाचं नेमकं काय झालं?, अशी चर्चा सुरु झाली. जिल्हा रुग्णालयाला मान्यता दिली म्हणजे नेमकं काय? मग अधी मंजूरी जो जीआर निघाला होता तो कशाचा होता? जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारत बांधकामास परवानगी अपेक्षीत असताना मुख्यमंत्र्यांनी त्या विषयाव न बोलता रुग्णालयाला मान्यता देण्याची घोषणा करुन मुळ विषयालाच बगल दिली आहे. जिल्हा रुग्णालयास मान्यता दिल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचा आता प्रत्येक जण आपापल्या परीने अर्थ लावत आहे. परंतू, मुख्यमंत्र्यांनी जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारत बांधकामाला परवानगी दिली, अशी सरळ, सरळ घोषणा केली असती तर तात्काळ जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारत बांधकामाची प्रक्रिया सुरु झाली असती, असेही लातूरकरांचे म्हणणे आहे.

