21.7 C
Latur
Wednesday, February 11, 2026
Homeलातूरजिल्ह्याच्या विकासाची मुहूर्तमेढ हरंगूळमधून रोवली जावी 

जिल्ह्याच्या विकासाची मुहूर्तमेढ हरंगूळमधून रोवली जावी 

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्याला आपल्याला प्रगतीपथावर न्यायचे असून जिल्ह्याचा चेहरामोहरा आपल्याला बदलायचा आहे. आपल्या गावाचा सर्वांगीण विकास साधायचा आहे. यासाठी आपल्याला आपल्या मताच्या ताकदीने ही सगळी परिस्थिती बदलायची असून हरंगूळ (बु) व हरंगूळ (खु) सह लातूर तालुका आणि जिल्ह्याला आपल्याला विकासाच्या मार्गावर न्यायचे आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाची मुहूर्तमेढ हरंगूळमधून रोवली गेली पाहिजे, यासाठी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.
लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या निमित्ताने राज्याचे माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरूवार दि. ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी लातूर तालुक्यातील हरंगूळ (बु), जिल्हा परिषद गट,व गण तसेच हरंगूळ (खु) पंचायत समिती गणातील काँग्रेस आघाडी उमेदवारांच्या निवडणूक प्रचारार्थ हरंगूळ (बु) या ठिकाणी  प्रचार सभा पार पडली. लातूर तालुक्यातल्या हरंगूळ (बु) जिल्हा परिषद गटातील सौ. भागीरथी शिवानंद पाटील व पंचायत समिती गणातील सत्यनारायण व्यंकट पाटील आणि हरंगूळ (खु) पंचायत समिती गणातील विलास माणिकराव उफाडे या काँग्रेस आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ हरंगूळ (बु) या ठिकाणी जाहीर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.
माजी मंत्री, आमदार अमित देशमुख पुढे म्हणाले की, भाजपने मागील काळात काय केले, आपण जाणताच. आपल्या हरंगूळ बु. साठी सिमेंट काँक्रीट रस्त्याची आवश्यकता असून या रस्त्याचे काम येणा-या काळात केले जाईल, असा शब्द त्यांनी  दिला. तसेच स्मशानभूमीसाठीच्या प्रश्नात एमआयडीसी जाणूनबुजून वेळ लावत असल्याचे या ठिकाणी आल्यानंतर समजले असून उद्याच संबंधित अधिका-यांना बोलून सदरील विषय मार्गी लावला जाईल, असे ते म्हणाले. आदरणीय विलासराव देशमुखसाहेब जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हणत असत. यंदा जिल्हा परिषद अध्यक्ष ओपन महिला प्रवर्गासाठी राखीव असून आपण या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे, जेणेकरून आपल्या गावाला अध्यक्षपदासाठी हक्क सांगता येईल, तेव्हा आपण काँग्रेस आघाडी उमेदवाराना आपले मतरुपी आशीर्वाद द्यावे आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्ये पाठवावे अशी विनंती त्यांनी केली.  हरंगूळ बु. या ठिकाणी शेजारच्या कारखान्यामुळे येणारे दूषित सांडपाणी तात्काळ बंद करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिका-यांना बोलू गरज पडली तर कारखाना बंद करण्यासाठीदेखील पाठपुरावा केला जाईल. पण शेजारच्या कारखान्याचे दूषित सांडपाण्यामुळे इथल्या ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येणार नाही याची काळजी घेतली जाईल, असा शब्द आमदार अमित देशमुख यांनी ग्रामस्थांना यावेळी दिला.
दरम्यान या वेळी बालाजी गडे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी धोंडीराम इगे, बाळासाहेब देशमुख, रामचंद्र सुडे, सूर्यकांत  सुडे, भीमाशंकर झुंजारे, श्याम प्रभुणे, बालाजी कैले, ज्ञानेश्वर वाघमारे, गणेश अडसूळे, आनंद पवार, गणेश पवार, धोंडीराम यादव, भालचंद्र सोनकांबळे, पंकज सुतार, प्रभू राठोड यांच्यासह हरंगूळ (बु) जिल्हा परिषद गट व गण यासह हरंगूळ (खु) पंचायत समिती गणातील मतदार बंधू, भगिनी, काँग्रेस आघाडी पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, महिला भगिनी व परीसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR