लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात उन्हाळयाची तीव्रता वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद, लातूर यांच्या वतीने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना युद्धपातळीवर राबवल्या जात आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी प्रशासनाकडून आज घडीला २ टँकरद्वारे पाणीपुरवठा आणि १०३ खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंश सेल्सीअसच्या वर कायम आहे. जिल्हयातील नद्या, ओढे, नाल्या कारडया पडत चालल्या आहेत. त्यामुळे पाण्याचे स्त्रोत बंद होऊन पाणी टंचाईचे संकट जाणवत आहे. ग्रामीण भागातील नागरीकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. जिल्ह्यातील १२७ गावे, ३६ वाडया, तांडयावर १९८ अधिग्रहणाची मागणी ग्रामपंचायतींकडे केली आहे.
८४ गावे, वाडयांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा
ग्रामीण भागातील गावांमध्ये पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी मोठया प्रमाणावर खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ८४ गावे, तांडे, वाड्यांसाठी १०३ विहिरी किंवा विंधन विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. यात औसा तालुक्यात २४ गावांमध्ये ३१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे, तर अहमदपूर तालुक्यात २५ गावे व वाड्यांमध्ये ३० विहिरी, उदगीर तालुक्यात १० गावांमध्ये ११ विहिरी, निलंगा तालुक्यात ७ गावांमध्ये १० विहिरी, जळकोट तालुक्यात ८ गावांमध्ये ९ विहिरी, चाकूर तालुक्यात ५ गावांमध्ये ५ विहिरी, रेणापूर तालुक्यात ३ गावांमध्ये ३ विहिरी, देवणी तालुक्यातील १ गावासाठी ३ विहिरी, लातूर तालुक्यात १ गावात १ विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
३३१० नागरिकांना दिलासा
आज घडीला जळकोट तालुक्यामध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवत असल्यामुळे तिथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. जळकोट तालुक्यातील २ गावे आणि १ वाडी अशा ३ ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवले जात असल्यामुळे सुमारे ३,३१० नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासाठी शासनाचे २ टँकर कार्यरत असून त्यांच्या दररोज ४ फे-या मंजूर करण्यात आल्या आहेत. या सर्व फे-या यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. प्रामुख्याने जळकोट तालुक्यातील शिवाजी नगर तांडा, वाघमारी तांडा आणि गव्हाण येथे टँकर मंजूर करण्यात आले आहेत.
















