लातूर : प्रतिनिधी
स्पर्धा परीक्षांची तयारी करुन नोकरी मिळवणा-या बेरोजगार युवकांची संख्या मोठी आहे. त्या तुलनेत नोकर भरतीमध्ये रिक्त जागांची संख्या खूप कमी आहे. अशा परिस्थितीत राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या नोकर भरतीत स्थानिक जिल्ह्याचे रहिवाशी असलेल्या युवकांना ७० टक्के जागा राखीव ठेवण्यासाठी लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी प्रभावी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्यानंतर जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेल्या युवकांना मोठा आनंद झाला. या आनंदातूनच जिल्ह्यातील युवकांनी एकत्र येत गुरुवारी जिल्हा बँकेत देशमुख यांचा सत्कार केला.
भुमिपुत्रांसाठी केलेल्या प्रभावी प्रयत्नांबद्दल धिरज विलासराव देशमुख यांचे युवकांनी आभारही मानले. काही महिन्यांपासून राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांतील नोकर भरतीच्या हालचाली सुरु आहेत. काही बँकांनी भरती प्रक्रियेच्या जाहिरातीही प्रसिद्ध केल्या आहेत. लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी एकीकडे लातूर जिल्हा बँकेच्या नोकर भरतीचे नियोजन करत दुसरीकडे या भरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना संधी मिळावी, यासाठी प्रयत्न केले. जिल्हा बँकेचे कार्यक्षेत्र हे जिल्ह्यापुरते मर्यादित असल्याने या भरतीत जिल्ह्यातील युवकांना मोठ्या प्रमाणात संधी मिळाली पाहिजे, यासाठी त्यांनी राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना पत्र देऊन पाठपुरावा केला. बाहेरच्या जिल्ह्यातील शेतकरी व संस्थांचा जिल्हा बँकेशी तेवढा संबंध येत नाही. नोकर भरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले तर त्यांच्याकडून बँकेच्या ग्राहक, सभासद व ठेवीदारांची चांगली सेवा घडून येईल, ही बाब माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना पटवून दिली. त्यानंतर सहकारमंत्री पाटील यांच्या पुढाकाराने काही दिवसापूर्वी जिल्हा बँकांच्या भरतीमध्ये स्थानिक जिल्ह्याचे रहिवाशी असलेल्या उमेदवारांसाटी ७० टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला. भरतीत ३० टक्के जागा इतर जिल्ह्यातील रहिवाशी उमेदवारांसाठी राखीव ठेवताना या जागांवरही इतर जिल्ह्यातील उमेदवार पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्यास त्या जागांवर स्थानिक जिल्ह्याचे रहिवाशी असलेल्या उमेदवारांना संधी देण्याचाही निर्णय घेतला.
याबाबतचा शासन निर्णय बाहेर पडताच राज्यभरातील स्थानिक जिल्ह्याचे रहिवाशी असलेल्या स्पर्धा परीक्षांतून नोकरीचे स्वप्न पाहणा-या युवकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. अशा लातूर जिल्ह्यातील युवकांनी गुरुवारी एकत्र येऊन जिल्हा बँकेच्या मुख्यालयात बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांचा सत्कार केला. तुमच्यामुळेच जिल्हा बँकेच्या भरतीत ७० टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय झाल्याचे सांगत सर्वांनी धिरज विलासराव देशमुख यांचे आभार मानले. युवक व शेतक-यांच्या मुलांच्या हक्कांसाठी मी शासनाकडे पाठपुरावा केला. शासनालाही माझे म्हणणे पटले आणि जिल्हा बँकांच्या भरतीत स्थानिक रहिवाशी युवकांना ७० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या. यापुढील काळातही युवक व शेतक-यांच्या मुलांसाठी आपला लढा कायम राहणार आहे, असे माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी युवकांना सांगितले.

