लातूर : प्रतिनिधी
एल-निनोच्या प्रभावामुळे लातूर जिल्ह्यात यावर्षी अद्यापपर्यंत पाऊस पडला नाही. सद्यस्थितीत उन्हाची तीव्रता कायम आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक समस्या उद्भवून नये व विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे हित लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतूदीस अनुसरून लातूर जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा आज दि. २३ जूनपासून पुढील आदेशापर्यंत सकाळी ८ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत सकाळच्या सत्रात करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दि. २२ जून रोजी दिले आहेत.
शैक्षणिक सत्र २०२६-२७ मध्ये दि. १५ जूनपासून शाळा नियमित सुरु झाल्या आहेत. एल-निनोच्या प्रभावामुळे जिल्ह्यात अद्यापपर्यंत पाऊस पडलेला नाही. उन्हाची तीव्रता कायम आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू नये म्हणून जिल्ह्यातील मराठी, हिंदी, उर्दु, इंग्रजी या सर्व माध्यमांच्या शाळा व सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व अभ्यासक्रम चालविणा-या शाळांची वेळ आज दि. २३ जूनपासून पुढील आदेशापर्यंत सकाळी ८ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत राहिल, असे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दि. २२ जून रोजी शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षणाधिकारी, लातूर शहर महानगरपालिका यांना दिलेल्या पत्रात नमुद केले आहे.
दरम्यान शैक्षणिक वर्ष २०२६-२७ हे रितसर सुरु झालेले असले तरी एल-निनोच्या प्रभावामुळे पावसाळा सुरु होऊनही अद्याप पाऊस पडला नाही. तीव्र उन्हामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील सर्वच माध्यमांच्या शाळा सकाळच्या सत्रात कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या वतीने शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्याची दखल घेत आमदार विक्रम काळे यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्यासह जिल्हाधिकारी यांच्याकडे सकाळच्या सत्रात शाळा भरवण्याची मागणी केली होती. अखेर जिल्हाधिकरी यांनी दि. २२ जून रोजी विशेष पत्राने जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा सकाळच्या सत्रात करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आजपासून जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा सकाळच्या सत्रात भरणार आहेत.
















