लातूर : प्रतिनिधी
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत लातूर जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध अभियान १७ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबर २०२५ दरम्यान राबविण्यात येणार आहे. प्रत्येक संशयित कुष्ठरुग्णांचा शोध आशा व स्वयंसेवक यांच्या पथकामार्फत घेतला जाणार आहे. हे पथक घरोघरी भेटी देऊन तपासणी करणार आहे. यासाठी जिल्ह्यात १ हजार ७४३ पथके तयार करण्यात आलेली आहेत. अभियान कालावधीत जिल्ह्यातील २२ लाख ६० हजार १७३नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे.
निदान न झालेले कुष्ठरुग्ण शोधून त्यांना त्वरीत बहुविध औषधोपचाराखाली आणणे, नवीन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडीत करून होणारा प्रसार कमी करणे, समाजात कुष्ठरोगाविषयी जनजागृती करणे, सन २०२७ पर्यंत शुन्य कुष्ठरोग प्रसाराचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करणे, हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हास्तरावर उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर यांच्या अध्यक्षखाली जिल्हा समन्वय समिती बैठक घेण्यात आली.
या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग), आरोग्य अधिकारी मनपा, जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी सर्व, जिल्हा लेखा व्यवस्थापक, जिल्हा आशा समन्वयक आदी सदस्य उपस्थित होते. नागरिकांनी या अभियान कालावधीत घरोघरी येणा-या आशा व पुरुष स्वंसेवक यांच्यामार्फत आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

