लातूर : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे लातूर जिल्ह्यात ओल्या दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी शासनाकडे लातूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन तातडीने शेतक-यांना सरसकट मदत करण्याची मागणी शासनाकडे करणार असल्याचे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तसेच लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. १७ सप्टेंबर रोजी काँग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगीतले.
मागील १५-२० दिवसांपासून लातूर जिल्हा, मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत माजी मंत्री, आमदार अमित देशमुख बोलत होते. यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे, माजी आमदार धिरज विलासराव देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, लातूर शहर जिल्हा काँगे्रसचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव, श्रीशैल्य उटगे, अॅड. समद पटेल, कल्याण पाटील, अमर खानापूरे, शीलाताई पाटील, विद्याताई पाटील, व्यंकटेश पुरी, डॉ. दिनेश नवगिरे यांची उपस्थिती होती.
लातूर जिल्हा मध्यम पावसाचा जिल्हा पण यंदा मे महिन्यापासूनच जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. जुन, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही पावसाने जिल्ह्यात धुमाकुळ घातला आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या १०० ते १४० टक्के पाऊस अधिक झाला आहे, असु नमुद करुन माजी मंत्री, आमदार अमित देशमुख म्हणाले, जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प तुडूंब भरले आहेत. सर्वत्र पुर आल्याने नदीकाठच्या जमिनी पिकांसह वाहून गेल्या आहेत. सोयाबीनसह सर्व पिके पिवळी पडली आहेत. मनुष्य जीवित हानी, प्राणी जीवित हानी, घरांची पडझड झाली आहे. सुमारे १४८ गावं बाधित झाली आहेत. आतापर्यंत २ लाख ११ हजार १०१ हेक्टर शेतजमिनीचे पंचनामे झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. जिल्ह्यात ओल्या दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. जनतेला शासनाकडून मदत देऊन धीर देण्याची गरज आहे.
संपूर्ण जिल्हाभर अतिवृष्टी झाली आहे. शेतशिवारांना तलावाचे स्वरुप आले आहे. संपूर्ण पिके पाण्यात आहेत. वीजेच खांब पडले, ट्रान्सफार्मर जळाले, घरांची पडझड झाली. जीवित हानी झाली, जनावरे वाहून गेली, ओला दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. सखल भागात पाणी साचल्यामुळे रोगराई वाढली आहे. पंचनामे करण्यासारखी परिस्थितीच राहिली नाही. त्यामुळे शेतक-यांना सरसकट मदत करवी, अशी मागणी आमदार अमित देशमुख यांनी केली आहे.
















