लातूर : प्रतिनिधी
राज्यातील शेतक-यांना पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी, तसेच त्यांना हवामान बदलाच्या संकटातून सावरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांबू आधारित क-वनीकरणावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने राज्य शासनाने महाराष्ट्र बांबू उद्योग धोरणही जाहीर केले आहे. हवामान बदलामुळे शेतीमध्ये निर्माण होणारी अनिश्चितता दूर करण्यासाठी बांबू हे एक प्रभावी पीक ठरत आहे. बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी लातूर जिल्ह्यात ‘बांबू विकास आणि सामाजिक सुरक्षा’ प्रकल्प राबविला जात आहे. लातूर जिल्ह्यात लोदगा येथील फिनिक्स फाउंडेशन आणि गोदरेज अॅग्रोव्हेट यांच्या संयुक्त विद्यमाने २०२३ पासून या प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. या अंतर्गत ६ लाखांहून अधिक रोपांची लागवड केली जाणार आहे.
या प्रकल्पांतर्गत शेतक-यांना केवळ बांबू लागवडीचे प्रशिक्षणच दिले जात नाही, तर त्यांच्या कौशल्य विकासावरही भर दिला जात आहे. लातूर जिल्ह्यात राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सचे प्रमुख पाशा पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबविला जात आहे. जिल्ह्यातील सर्व १० तालुक्यांमध्ये २०२३ ते २०२५ या कालावधीत सुमारे ६ लाख ११ हजार ७२९ बांबू रोपांची लागवड पूर्ण झाली आहे. आतापर्यंत एकूण २ हजार ८५२ शेतक-यांनी या मोहिमेत नोंदणी केली असून, त्यापैकी १ हजार ९५३ शेतक-यांनी शासकीय अनुदानासाठी अर्ज सादर केले आहेत. या प्रकल्पासाठी शासनाकडून सुमारे ९० कोटी २७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
बांबू हे कमी पाण्यावर येणारे पीक असून, उसाच्या तुलनेत याला अत्यंत कमी पाणी आणि रासायनिक खतांची गरज भासते. बांबूची झाडे इतर वृक्षांच्या तुलनेत ३० ते ३५ टक्के अधिक ऑक्सिजन उत्सर्जित करतात आणि मोठ्या प्रमाणात कार्बन शोषून घेतात. औष्णिक विद्युत प्रकल्पांमध्ये कोळशाला पर्याय म्हणून बांबूचा वापर होत असल्याने देशाच्या स्वच्छ ऊर्जा मोहिमेला (ग्रीन एनर्जी) यामुळे चालना मिळत आहे. औसा तालुक्यातील लोदगा येथे बांबू रोपवाटिका आणि अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे. या प्रकल्पांतर्गत गाव आणि तालुक पातळीवर समन्वयक नियुक्त करण्यात आले आहेत. हे समन्वयक प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन शेतक-यांना जमिनीची निवड, खड्डा खोदणे, ठिबक सिंचन आणि खत व्यवस्थापनाचे तांत्रिक मार्गदर्शन करत आहेत. यात प्रामुख्याने तुल्डा मानवेल यांसारख्या प्रगत जातींच्या ऊतक संवर्धन (टिश्यू कल्चर) तंत्रावर भर दिला जात आहे.

