लातूर : प्रतिनिधी
जेष्ट राईट्स फॉर चिलड्रनच्या माध्यमातून युवा रुरल असोसिएशन लातूर, जिल्हा महिला व बालविकास विभाग, लातूर आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर यांच्या पुढाकाराने लातूर जिल्ह्यात सुरू असलेल्या शंभर दिवसांचे बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत बालविवाह मुक्ती रथाचा शुभारंभ महाविधी सेवा शिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा कार्यक्रमादरम्यान उत्साहात संपन्न झाला.
न्यायमूर्ती एस जी चपळगांवकर, न्यायमूर्ती, उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद तथा पालक न्यायमूर्ती न्यायिक जिल्हा लातूर यांच्या शुभहस्ते व न्यायमूर्ती श्रीमती वैशाली पाटील-जाधव (न्यायमूर्ती, उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद तथा पालक न्यायमूर्ती न्यायिक जिल्हा लातूर) यांचे प्रमुख उपस्थितीत एस. जे. भारुका प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लातूर यांचे अध्यक्षतेखाली आणि वर्षा ठाकूर-घुगे जिल्हाधिकारी लातूर, अमोल तांबे पोलीस अधीक्षक लातूर, राहुल कुमार मीना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर, मानसी मीना आयुक्त लातूर महानगरपालिका, व्ही. एन. गिरवलकर सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लातूर आणि जावेद शेख जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद लातूर आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत बालविवाह मुक्त भारत अभियान रथाला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
या १०० दिवसीय बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत सुरू करण्यात आलेला बालविवाह मुक्ती रथ संपूर्ण लातूर जिल्ह्यात फिरणार असून जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती व गावपातळीवर व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. ‘‘बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे’’ हा संदेश विविध गाणी, पोस्टर, बालविवाह निर्मूलन शपथ कार्यक्रम आणि माहितीपर उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. बालविवाहाबाबत माहिती देण्यासाठी १०९८ या हेल्पलाईन क्रमांकावर कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.बालविवाह निर्मूलन रथावर उपस्थित मान्यवरांनी स्वाक्षरी करून शुभेच्छा दिल्या व या उपक्रमाचे कौतुक केले. विशेषत: युवा रुरल असोसिएशन च्या पुढाकाराचे अभिनंदन करण्यात आले. या उपक्रमाची संकल्पना जिल्हा बाल संरक्षण अधिकारी धम्मानंद कांबळे आणि युवा रुरल असोसिएशन कार्यक्रम समन्वयक सद्दाम शेख यांच्या अथक परिश्रमातून साकारण्यात आली आहे. यावेळी सिताराम कांबळे (बाल संरक्षण अधिकारी), अमोल गायकवाड (क्षेत्र समन्वयक, युवा रुरल असोसिएशन) तसेच संभाजी कांबळे (चाइल्ड लाईन) उपस्थित होते. लातूर जिल्ह्यात बालविवाह निर्मूलनासाठी हा उपक्रम प्रभावी ठरणार असून समाजातील सर्व घटकांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

