21.4 C
Latur
Saturday, December 7, 2024
Homeलातूरजिल्ह्यात शांततामय वातावरणात, उत्स्फुर्तपणे मतदान

जिल्ह्यात शांततामय वातावरणात, उत्स्फुर्तपणे मतदान

लातूर : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीसाठी लातूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात आज उत्साहपूर्ण आणि शांततामय वातावरणात मतदान झाले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ६१.४३ टक्के मतदारांनी आपला हक्क बजाविला. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी विविध मतदान केंद्रांना भेटी देवून तेथील मतदान प्रक्रियेची पाहणी केली. तसेच सामान्य निवडणूक निरीक्षक डॉ. करुणा कुमारी, लक्ष्मीकांत प्यारेलाल प्रधान, साकेत मालवीया, पोलीस निवडणूक निरीक्षक प्रमोद कुमार मंडल यांनीही जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या.
लातूर जिल्ह्यातील सर्व २ हजार १४३ मतदान केंद्रांवर सकाळी ७ वाजताच मतदानाला सुरुवात झाली. अनेक मतदान केंद्रांवर सकाळी ७ पासूनच मतदारांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. ग्रामीण भागासह शहरी भागातील अनेक मतदान केंद्रांवर सकाळीच मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत सर्व मतदान केंद्रांवर व्हीलचेअर, पिण्याचे पाणी, प्रथमोपचार पेटी, प्रतिक्षा कक्ष किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तसेच मतदान केंद्राबाहेर सावलीसाठी मंडप उभारण्यात आला होता.
जिल्ह्यातील १ हजार २२७ मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रियेचे वेब कांिस्टग करण्यात आले. याद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात तयार करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षातून मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यात येत होते. जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सकाळी मतदान प्रक्रिया सुरु झाल्यानंतर या कक्षाला भेट देवून मतदान केंद्रांवर सुरु असलेल्या कामकाजाची पाहणी केली. तसेच मतदान केंद्रावर नियुक्त्त मतदान पथकांना दूरध्वनीद्वारे सूचना दिल्या. उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, वेबकांिस्टगचे सहायक नोडल अधिकारी नितीन आगावणे यावेळी उपस्थित होते.
यानंतर जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे आणि पोलीस अधीक्षक श्री. मुंडे यांनी लातूर शहर मतदारसंघातील मतदान केंद्रांना भेटी दिल्या. याठिकाणी आलेल्या मतदारांशी त्यांनी संवाद साधला. तसेच मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांबाबत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. मतदानाचा हक्क बजाविलेल्या मतदारांचे त्यांनी यावेळी अभिनंदन केले. दुपारच्या वेळी काही काळ मतदान केंद्रावरील रांगा कमी झाल्यानंतर सायंकाळच्या सत्रात ग्रामीण व शहरी भागातील मतदान केंद्रांवरही मोठी गर्दी दिसून आली.
दिव्यांग मतदारांसाठी भारत निवडणूक आयोगाने व्हीलचेअर, घरापासून ते मतदान केंद्रापर्यंत मोफत वाहन व्यवस्था आदी सुविधा उपलब्ध करून दिली होती. तसेच दृष्टी दिव्यांगत्व असलेल्या मतदारांसाठी ब्रेललिपीतून उमेदवारांची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे इतर कोणाचीही मदत न घेता त्यांना मतदान करणे शक्य झाले. दिव्यांग मतदारांना देण्यात आलेल्या या सुविधांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले, तसेच भारत निवडणूक आयोगाचे आभार मानले. दिव्यांग मतदारांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियुक्त नोडल अधिकारी तथा समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोष नाईकवाडी यांनीही प्रत्यक्ष मतदान केंद्रांवर उपस्थित राहून मतदारांना सहाय्य केले. तसेच जिल्ह्यातील सर्व दिव्यांग मतदारांना सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत समन्वय केला.
मतदारांना आपला अधिकारी बाजाविणे सोयीचे व्हावे, यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार किमान आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. यासोबतच मतदान केंद्रांवर येणा-या गरोदर महिला, वयोवृद्ध मतदारांना रांगेत उभे न करता प्राधान्याने थेट प्रवेश देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या होत्या. यामुळे त्यांना मतदान केंद्रावर प्रतिक्षा करावी लागली नाही. जिल्हा निवडणूक यंत्रणेने गरोदर महिला, वयोवृद्ध मतदारांची काळजी घेतल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त्त केले.
जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराला आपला हक्क बजाविता यावा, यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून आवश्यक सज्जता करण्यात आली होती. ‘स्वीप’ उपक्रमांतर्गत युवकांसाठी कॉफी विथ कलेक्टर, महिलांसाठी संवाद कार्यक्रम यासह अभिनव उपक्रम राबविण्यात आले. या माध्यमातून मतदारांना लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. मतदानाला सुरुवात झाल्यानंतर नवमतदारांसह ज्येष्ठ मतदारही मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडल्याचे दिसून आले. तसेच दुपारपासून महिला मतदारांचीही मोठ्या गर्दी वाढली. पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजाविण्याची संधी मिळालेल्या मतदारांचा उत्साह यावेळी त्यांच्या चेह-यावर दिसून येत होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR