लातूर : प्रतिनिधी
यंदा वरुणराजाने लातूर जिल्ह्यावर प्रचंड नाराजी व्यक्त केलेली दिसून येत आहे. जिल्ह्यातील पावसाचे गणितच पूर्णपणे बिघडले आहे. जिल्ह्याची सरासरी ७०६ मिली मीटर असताना गेल्या तीन महिन्यांत केवळ २९२.७ मिली मीटर पाऊस पडला आहे. म्हणजेच सरासरीच्या तुलनेत तब्बल ४१३.३ मिली मीटर पावसाची तूट आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत पावसाने जोरदार हजेरी लावली होती. २८ व २९ ऑगस्ट २०२५ रोजी संपूर्ण जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. गतवर्षी ९२६.०४ मिली मीटर पावसाची नोेंद झाली होती.
लातूर जिल्हा हा पर्जन्यछायेखालील भाग असल्याने जिल्ह्यात दरवर्षी समाधानकारक पाऊस पडत नाही. कधी अतिवृष्टी, ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ अशी परिस्थिती असते. यंदा ७ जुनपासून आतापर्यंत २७४.७ मिली मीटर पाऊस झाला आहे. दि. २५ जून रोजी ६ मिली मीटर पावसाची नोंद झाली होती. जुन, जुलै आणि आता ऑगस्ट या तीन महिन्यांत सरासरीच्या केवळ ४० टक्के पाऊस पडला आहे. आता उर्वरित ६० टक्के पाऊस पडण्याची गरज असताना केवळ ३० टक्के पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आता मान्सून परतीच्या २ महिन्यांत पावसाने जोरदार हजेरी लावण्याची अपेक्षा केली जात आहे. यामुळे जिल्ह्यात मान्सून शेवटला पाण्याच्या स्थितीत वाढ होणार असल्याचे सांगीतले जात आहे. त्यामुळे शेतकरी आणि प्रशासनाचे लक्ष आता सप्टेंबरकडे लागले आहे.
मान्सूनच्या माघारीच्या काळात निर्माण होणा-या हवामान प्रणालीमुळे सप्टेंबरअखेर किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला पुन्हा पावसाच्या सरी कोसळतात. गेल्या वर्षी पावसाने जिल्ह्यात तब्बल ९२६.०४ मिली मीटरची साथ दिली होती. यंदा मात्र पावसाळ्याचे तीन महिने संपले तरी आकडा २९२.७ मिली मीटरवरच आहे. सरासरी ७०६ मिली मीटरच्या तूलनेत ही तूट ४१३.३ मिली मीटर आहे. त्यामुळे जलसाठे, शेती
आणि आगामी रबी हंगामाबाबत चिंता कायम अहो. मात्र, अधून-मधून येणा-या हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाने पिके तग धरुन आहेत.
















