लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी या वर्षी शासन, प्रशासन आणि लोकांच्या सहभागातून मोठया प्रमाणात वृक्ष लागवड होणार आहे. दि. १५ मे ते २५ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणा-या ‘माझा जिल्हा, हरित जिल्हा उपक्रमाला टप्या-टप्याने विविध १३ सामाजीक उपक्रमांची जोड देण्यात येत असून या उपक्रमाचा आज पर्यवरण दिनी तिसरा टप्पा वृक्ष लागवड करून राबविला जाणार आहे.
लातूर जिल्हयात मान्सूनचा पाऊस होण्याच्या पूर्वीच अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावून वृक्ष लागवडीसाठी पोषक वातावरण तयार केले आहे. जिल्हयात वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये गाव आणि शहरी पातळीवर वृक्ष लागवडीसाठी जागा निश्चित करून खड्डे खोदण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच शाळा, ग्रामपंचायत, नगरपरिषद कार्यालय, तलाठी कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि अंगणवाडी याठिकाणी विविध वृक्षांच्या बिया जमा करून ‘सीड बँक’ तयार करावी. ५ जून रोजी पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवड करण्यासाठी शाळेत अथवा पाणी व जागा उपलब्ध असलेल्या ठिकाणी सीड बँकेतील बियांपासून रोपवाटिका तयार करावी. तसेच याठिकाणी किमान दहा झाडे लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
वट पौर्णिमेनिमित्त १० जून रोजी गावात किमान १० वडांच्या झाडांची महिलांच्या हस्ते लागवाड करावी. ‘शाळेत पहिले पाऊल, वृक्ष लावून’ हा उपक्रम १६ जून रोजी राबविण्यात यावा. २६ जून रोजी राजर्षी शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त प्रत्येक गावात किमान १५० रोपांची लागवड करावी. १ ते ७ जुलै या कालावधीत कृषि सप्ताह अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किमान २०० रोपांची लागवड शेतक-यांच्या बांधावर करावी, ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये लोकसंख्येइतकी झाडे लावण्याचे नियोजन करावे. २७ जुलै रोजी श्रावण मास आरंभानिमित्त प्रत्येक गावात ५ बेलाची झाडे लावणे, ९ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णीमेला प्रत्येक ग्रामपंचायतीने किमान ५० नारळाची झाडे लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच रक्षाबंधन निमित्त भावाने बहिणीस भेटवस्तूसोबत तिच्या आवडीचे एक रोप भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रत्येक गावात वृक्ष लागवडीचे आयोजन करणे, तसेच २५ ऑगस्ट रोजी महा वृक्ष लागवड दिन आयोजित करून सर्व शासकीय विभागांनी वृक्ष लागवड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या मोहिमेंतर्गत वृक्ष लागवड आणि वृक्ष संगोपनामध्ये उत्कृष्ट काम करणा-या प्रत्येक तालुक्यातील ३ ग्रामपंचायती, १ सामाजिक संस्था, तसेच जिल्हास्तरावर ३ ग्रामपंचायती, १ सामाजिक संस्था यांना प्रजासत्ताक दिनी मान्यवरांच्या हस्ते विशेष परितोषिक दिले जाणार आहे.