सोलापूर : खरीप हंगामासाठी नव्या शेतकऱ्यांना कर्ज वाटपात स्टेट बँक ऑफ इंडिया आघाडीवर असून या बँकेने तीन हजार शेतकऱ्यांना ११३ कोटी रुपये पीक कर्ज दिले आहे. डीसीसी बँकेनेही नव्या दोन हजार शेतकऱ्यांना कर्ज दिले आहे; माञ ती रक्कम १७ कोटी ५५ लाख रुपये इतकी आहे.
यंदा पाऊस लवकर पडल्याने व पेरणीला पोषक वातावरण असल्याने खरीप पेरणीला आता चांगलाच वेग आला आहे. बँकांही जुन्या कर्जाचे नूतनीकरण व नव्यानेही पीक कर्ज देत आहेत. सोलापूर जिल्ह्यात जशी खरीप पेरणीची धांदल सुरू आहे तशी उसाच्या मशागतीचे काम वेगाने सुरू आहे. याशिवाय केळी, डाळिंब व इतर फळबागांच्या आंतर मशागतीसाठीही शेतकरी अडकून पडला आहे.
यासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. त्यासाठी शेतकरी बँकांकडे चकरा मारत आहेत. बँका मागील जुन्या कर्जाचे नूतनीकरण (नवे-जुने) करण्याला प्राधान्य देत आहेत याशिवाय नवीन शेतकऱ्यांना कर्ज दिले जात आहे. नव्या शेतकऱ्यांना कर्ज वाटपात स्टेट बैंक ऑफ इंडिया आघाडीवर आहे. त्यानंतर युनियन बँकेने ८७२ शेतकऱ्यांना २३ कोटी, आयडीबीआय बँकेने ७२७ शेतकऱ्यांना २० कोटी १६ लाख तर डीसीसी बँकेने दोन हजार ६२ शेतकऱ्यांना १७ कोटी ५५ लाख रुपये पीक कर्ज दिले आहे.
आत्तापर्यंत जिल्ह्यातील बहुतेक सर्वच बँका जुन्याच कर्जदारांना जुने कर्ज भरून नव्याने कर्ज देत होत्या. नव्याने कर्ज मागायला गेलेल्या शेतकऱ्यांना सहजासहजी कर्ज बँका देत नव्हत्या. ही तक्रार बँका ऐकून घेत नव्हत्या व लिड बँकेला अशी माहिती विचारली तर ती दिली जात नव्हती. धाराशिवचे खा. ओमराजेंनी नवीन शेतकऱ्यांना किती कर्ज वाटप केले याची माहिती विचारली असता ती उपलब्ध नव्हती; मात्र अशी माहिती बँकांना देण्याची सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्याने आता बँकांना नवीन कर्ज वाटप केलेली माहिती द्यावी लागत आहे.
जुन्या कर्जाचे नूतनीकरण ५३ हजार ३३४ शेतकऱ्यांना २०१ कोटी ४० लाख तर नव्याने ९ हजार ५७९ शेतकऱ्यांना २४३ कोटी रुपये असे एकूण ६३ हजार शेतकऱ्यांना ११४४ कोटी रुपये पीक कर्ज वाटप केले आहे.सोलापूर डीसीसी बँकेने अठरा हजार शेतकऱ्यांना ३१७ कोटी तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेने साडेचौदा हजार शेतकऱ्यांना २२५ कोटी अशी दोन बँकांनीच ३२ हजार सातशे शेतकऱ्यांना ४४२ कोटी रुपये खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटप केले आहे. इतर राष्ट्रीय, खासगी बँकांचा कर्ज वाटपात सहभाग कमी आहे.