लातूर : एजाज शेख
जेव्हा एखाद्या गावात किंवा वाडीत तीव्र पााणीटंचाई निर्माण होते आणि सार्वजनिक पाण्याचे स्त्रोत (सार्वजनिक विहिरी किंवा विंधन विहिरी) कोरडे पडतात, तेव्हा महाराष्ट्र पिण्याचे पाणीपुरवठा (अधिग्रहण) अधिनियम १९८३ नूसार सरकार स्थानिक शेतकरी किंवा नागरिकांची खाजगी विहीर अथवा बोअरवेल तात्पूरत्या स्वरुपात ताब्यात घेते. या अधिग्रहीत केलेल्या विहिरींमधून टँकरद्वारे किंवा तात्पुरत्या पाईपलाईनद्वारे गावाला पाणीपुरवठा केला जातो. लातूर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील १० तालुक्यांपैकी ९ तालुक्यांतील निरनिराळ्या १७३ गावांसाठी २५६ अधिग्रहण केले आहेत.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी प्रशासनामार्फत विविध तालुक्यांमध्ये खाजगी विहिरी व विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ९ तालुक्यांपैकी निरनिराळ्या गावांमध्ये व वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी एकूण २५६ विहिरींचे आणि विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये लातूर तालुक्यात १३ गावांसाठी १९ विहिरी, औसा तालुक्यात ३२ गावांसाठी ५१ विहिरी, रेणापूर तालुक्यात २१ गावांसाठी २८ विहिरी, उदगीर तालुक्यात ७ गावांसाठी ७ विहिरी, अहमदपूर तालुक्यात ३८ गावांसाठी ४१ विहिरी, चाकूर तालुक्यात १७ गावांसाठी १७ विहिरी, देवणी तालुक्यात ११ गावांसाठी २४ विहिरी, निलंगा तालुक्यात २५ गावांसाठी ४५ विहिरी आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यात ९ गावांसाठी २४ विहिरींचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण १७३ गावे व वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी २५६ विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहित करून नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे.
लातूर शहरात महानगरपालिकेचे एकुण विद्यूत पंप १०४७ आहेत. त्यातील ६४ विद्यूत पंप कायमस्वरुपी बंद आहेत. ९४७ विद्यूत पंप चालू आहेत. पाण्याअभावी ६९ विद्यूत पंप बंद पडलेले आहेत. तर ३० विद्यूत पंपांना पाणी अत्यंत कमी आहे. मनपाचे २५४ हातपंप आहेत. त्यापैकी १३० हातपंत बंद पडलेले आहेत. १२४ हातपंप चालू आहेत. ५० हातपंपांचे पाणी कमी झाले आहे. हातपंपांची दुरुस्ती सुरु असून त्यातील ७० ते ८० हातपंप लवकरच सुरु होतील.
















