कंधार : विश्वाभर बसवंते
कंधार शहरातील जिल्हा परिषद मुलींची शाळेच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असुन निझाम कालीन बांधकाम असलेल्या या शाळेच्या भिंती मोडकाळीस आल्या आहेत तर कुजलेल्या पत्रांची चाळण झाली आहे. ऊन, वारा पाऊस सहन करीत, जीर्ण झालेल्या या इमारतीतच शिक्षकांना व विद्यार्थ्यांना जिव मुठीत घेवून ज्ञानाचा धडे गिरवावे लागत आहे. सदर इमारतीच्या दुरुस्ती कामासाठी जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
कंधार शहरातील जुनी भाजी मंडई परिसरात जिल्हा परिषद मुलींची हायस्कुल कार्यरत आहे निझामकालीन बांधकाम असलेल्या या इमारतीत पूर्वी पासूनच १ ली ते ८ वी पर्यंतचे उर्दू कन्याचे वर्ग चालतात. मद्यंतरी कांही वर्षा खाली शहरात दुसरी कडे चालत असलेली मराठी माध्यमाची १ ली ते ४ थी पर्यंतची जि.प.प्राथमिक शाळा ही याचा इमारतीत भरवण्यात येते, खोल्या कमी आणि वर्ग जास्त अशी अवस्था झाल्याने शाळेच्या प्रांगणात उघड्यावरच कांही वर्ग भरत असतात. शाळेच्या भिंती अतिशय जीर्ण झाल्या असुन कधी ढसाळतील याची शास्वती नाही. कुजलेल्या पत्रांची अक्षरश: चाळन झाली आहे. धोकादायक इमारतीतच विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत. गत दोन वर्षा पासुन या इमारतीची दुरुस्ती करण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. मात्र जिल्हा परिषदे कडून याकडे दुर्लक्षच केल्या जात आहे.
या शाळेच्या इमारतीची येत्या १५ दिवसात दुरुस्ती करावी, अन्यथा पालक व विद्यार्थ्यां सह आपल्या कार्यालयातच शाळेचे वर्ग भरवू, असा ईशारा काँग्रेस पक्षाचे कंधार शहराध्यक्ष महमद हमीद महमद सुलेमान यांनी जिल्हा परिषद नांदेडचे शिक्षणाधिकारी (प्रा.) यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनावर काँग्रेस अल्पसंख्यांकचे अध्यक्ष महमद अजिमोद्दीन यांचीही स्वक्षरी आहे. शासनस्तरावरून शिक्षणावर भरमसाठ पैसा खर्च करीत असल्याचा नेहमीच गवगवा होत असतो. पैसा उपलब्ध होतो तर मग जिल्हा परिषदेचे अधिकारीच शाळा इमारतींच्या डागडुजी कडे दुर्लक्ष करतात का? हा मोठा प्रश्न पालकांमधून चर्चिला जात आहे.