जीएसटीच्या जाचातून सुटका!

देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये व्यापारी वर्गाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. उद्योग, व्यापार आणि बाजारपेठेतील उलाढाल वाढल्याशिवाय अर्थव्यवस्थेला गती मिळू शकत नाही. यामुळे व्यापा-यांना विश्वासाचे आणि सुरक्षिततेचे वातावरण उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे; मात्र भारतामध्ये व्यापा-यांकडे संशयाने पाहण्याची आणि त्यांच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची प्रशासकीय प्रवृत्ती अनेक वर्षांपासून दिसून येते. वस्तू व सेवा करप्रणाली लागू झाल्यानंतरही या मानसिकतेमध्ये अपेक्षित बदल झाला नव्हता. करासंबंधी वाद निर्माण झाल्यास व्यापा-यांना अटकेची आणि तुरूंगवासाची भीती दाखवली जात होती. अशा परिस्थितीत जीएसटीच्या अंमलबजावणीतील कठोर तरतुदी शिथिल करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय व्यापारी वर्गाला दिलासा देणारा ठरू शकतो.

भारतामध्ये १ जुलै २०१७ रोजी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्यात आला. त्या मागे संपूर्ण देशात अप्रत्यक्ष करांची एकसंध व्यवस्था निर्माण करणे आणि राज्यांच्या सीमांवरील करांचे अडथळे दूर करून व्यापार सुलभ करणे हा मुख्य हेतू होता. त्या आधी उत्पादन शुल्क, सेवा कर, मूल्यवर्धित कर (व्हॅट) आणि विविध स्थानिक उपकरांच्या जाळ्यात अडकलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला एकसंध बाजारपेठेत रुपांतरित करण्यासाठी देशाच्या राज्यघटनेत ऐतिहासिक १२२ वी घटनादुरूस्ती करण्यात आली. या नव्या रचनेमुळे दरमहा करसंकलनात मोठी वाढ झाली आणि मासिक करपात्र पुरवठा २५ टक्क्यांहून अधिक वाढून ५० लाख कोटी रुपयांच्या पुढे पोहोचला खरा; परंतु सुरुवातीच्या काळात सातत्याने बदलणारे नियम, इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवण्यातील क्लिष्टता, परताव्यातील दिरंगाई आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर अधिका-यांना मिळालेले थेट अटकेचे अमर्याद अधिकार यामुळे लहान व मध्यम उद्योजकांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता निर्माण झाली होती. किरकोळ तांत्रिक त्रुटी आणि जाणीवपूर्वक केलेली करचोरी यातील सीमारेषा धूसर झाल्यामुळे निर्माण झालेल्या प्रशासकीय दबावाच्या पार्श्वभूमीवर, करव्यवस्थेत केवळ महसूल वाढवण्यापेक्षा व्यापारी जगताचा विश्वास संपादन करणे अधिक कळीचे बनले होते.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच पार पडलेल्या वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या ५७ व्या बैठकीत करप्रणालीमध्ये व्यापक आणि दूरगामी प्रशासकीय सुधारणांना मंजुरी देण्यात आली आहे. करांच्या दरांमध्ये कोणताही बदल न करता करदात्यांना थेट दिलासा देण्यावर यावेळी भर देण्यात आला आहे. करप्रणालीतील दहशत कमी करून ती अधिक विश्वासार्ह आणि स्वयंचलित करण्याच्या दिशेने घेतलेले निर्णय हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. या बैठकीतील सर्वात मोठा दिलासा व्यापा-यांवरील फौजदारी कारवाईशी संबंधित आहे. आतापर्यंत जीएसटी कायद्यांतर्गत असणारे अटकेचे थेट अधिकार रद्द करण्याचा निर्णय परिषदेने घेतला असून खटला दाखल करण्यासाठीची आर्थिक मर्यादा आता ५ कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त, किमान शिक्षेची पूर्वीची सक्त काढून टाकून दंड, कारावास अथवा दोन्ही शिक्षा ठरवण्याचे पूर्ण अधिकार आता न्यायालयाच्या विवेकाधीन ठेवण्यात आले आहेत. ज्या प्रकरणांमध्ये विशिष्ट दंडाची स्वतंत्र तरतूद नाही, अशा सर्वसाधारण प्रकरणांमधील दंड २५ हजार रुपयांवरून थेट १० हजार रुपयांपर्यंत कमी करण्यात आला आहे. कर प्रशासनाचा दृष्टिकोन ‘दहशत निर्माण करण्यापेक्षा आधुनिक तंत्रज्ञानाने शोध घेण्यावर’ केंद्रित करण्याच्या उद्देशाने हे बदल करण्यात आले असून यामुळे प्रामाणिक करदात्यांवरील प्रशासकय दबावाचे सावट मोठ्या प्रमाणावर दूर होणार आहे.

कर परतावा वेळेवर मिळणे ही देशातील लहान-मोठ्या सर्वच उद्योजकांची आणि व्यापा-यांची मूलभूत गरज असते. अनेकदा परताव्याची रक्कम प्रदीर्घ काळ अडकून पडल्यामुळे दैनंदिन व्यवहारांवर आणि खेळत्या भांडवलावर विपरीत परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर कर परताव्याच्या दाव्याची पोहोचपावती देण्याची मुदत १५ दिवसांवरून १० दिवसांपर्यंत कमी करण्यात आली आहे. संबंधित अधिका-याने १० दिवसांच्या आत पोहोचपावती दिली नाही अथवा त्रुटींची नोटीस काढली नाही तर तो दावा संगणकीय प्रणालीद्वारे आपोआप मंजूर मानला जाईल. या शिवाय, जोखीम विश्लेषणाच्या आधारे कर परताव्याच्या एकूण रकमेपैकी ९० टक्के रक्कम कोणत्याही अधिका-याच्या हस्तक्षेपाशिवाय स्वयंचलित पद्धतीने आणि केवळ ३ कामकाजाच्या दिवसांत जमा केली जाणार आहे. रोख खात्यातील अतिरिक्त शिल्लक रकमेचा परतावादेखील आता मानवी हस्तक्षेपाशिवाय थेट खात्यात वर्ग होणार असल्याने उद्योजकांच्या खेळत्या भांडवलाची अडचण लक्षणीय प्रमाणात सुटू शकेल. नोंदणी प्रक्रियेत आणि नियमांच्या पालनातही सुलभता आणण्यासाठी परिषदेने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. कमी जोखीम असलेल्या अर्जदारांना अधिका-यांच्या मध्यस्थीशिवाय अवघ्या ३ दिवसांत जीएसटी नोंदणी देण्याची व्यवस्था अधिक सुटसुटीत केली जाईल. व्यापा-यांच्या अर्जावर आता केवळ त्यांच्या व्यवसायाशी सुसंगत असलेले पर्याय दिसतील. महत्त्वाचे म्हणजे, नोंदणीतील दुरूस्त्या जसे की व्यवसायाचे नाव, संचालक किंवा भागीदारांचे नाव अथवा अतिरिक्त व्यवसायाच्या जागेचा पत्ता बदलणे आता स्वयंचलित पद्धतीने मंजूर केले जाणार आहे.

नोव्हेंबर २०२५ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत दुरूस्तीसाठी आलेल्या सुमारे १६.७३ लाख अर्जांपैकी ६५ टक्क्यांपेक्षा जास्त अर्ज अशाच नियमित दुरूस्त्यांचे होते. हे अर्ज आता विनाविलंब निकाली निघणार असल्याने प्रशासकीय अडथळे दूर होतील.
लहान करदात्यांना दिलासा देण्यासाठी आणि इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ विस्तारण्यासाठी परिषदेने धोरणात्मक भूमिका घेतली आहे. ५ कोटी रुपयांपर्यंत वार्षिक उलाढाल असणा-या आणि केवळ थेट ग्राहकांना माल पुरवणा-या व्यापा-यांना आता वर्षातून एकदाच वार्षिक विवरणपत्र भरण्याचा ऐच्छिक पर्याय उपलब्ध करून दिला जाईल; मात्र त्यांना करभरणा तिमाही स्वरूपात करावा लागेल. सक्रिय करदात्यांपैकी सुमारे १६.८५ लाख व्यावसायिक या स्वरूपाचे व्यवहार करतात, ज्यांच्यावर करदायित्वाचा भार एक टक्क्यापेक्षाही कमी आहे. यामुळे लाखो लहान व्यापा-यांना दरमहा कागदपत्रे आणि विवरणपत्रे भरण्याच्या त्रासातून मोठी मुक्तता मिळणार आहे. याच बरोबर कर्मचा-यांसाठी काढलेला आरोग्य व जीवन विमा, दूरसंचार टॉवर्स, कारखान्याबाहेरील पाईपलाईन आणि कायद्यानुसार नष्ट करावा लागणारा मुदत संपलेला माल यावरही आता इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेता येणार आहे. मूळ इनव्हॉईस बाळगणा-या आणि पूर्ण मोबदला देणा-या प्रामाणिक खरेदीदारांच्या इनपुट टॅक्स क्रेडिट संरक्षणासाठी अधिका-यांची स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली असून ती ३ महिन्यांत आपला अहवाल सादर करणार आहे.
एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी मालाची वाहतूक करणा-या वाहनांच्या तपासणीबाबत अधिका-यांचे मनमानी अधिकार नियंत्रित करण्यात आले आहेत. आता रस्त्यावर धावणा-या वाहनांची अचानक तपासणी करता येणार नाही. केवळ संयुक्त आयुक्त किंवा त्याहून वरिष्ठ दर्जाच्या अधिका-याने दिलेल्या गुप्त माहितीच्या अधिकृत आदेशानुसारच वाहन थांबवले जाऊ शकेल शिवाय, केवळ ज्या राज्यातून माल निघाला आहे आणि ज्या राज्यात माल उतरवला जाणार आहे त्या दोनच राज्यांतील तपास यंत्रणांना अशी कारवाई करण्याचा अधिकार राहील. मार्गातील इतर राज्यांना वाहने थांबवून तपासणी करता येणार नाही. यामुळे आंतरराज्य माल वाहतुकीतील अनावश्यक विलंब टळून पुरवठा साखळी अधिक गतिमान होईल तसेच सेवा क्षेत्रातील निर्यातदारांनाही कर सवलतींचे लाभ विस्तारण्यात आले आहेत.

व्यापारी किंवा करदात्याकडून कर भरणा करताना एखादी चूक झाली किंवा तांत्रिक नियमांचे उल्लंघन झाले तर प्रत्येक वेळी त्या मागे गुन्हेगारी हेतूच असतो असे मानणे अत्यंत असमंजसपणाचे ठरते. वास्तविक पाहता, कर प्रणालीतील गुंतागुंत, क्लिष्ट नियमांचे वेगवेगळे अर्थ आणि प्रशासकीय प्रणालीतील त्रुटी यामुळेही अनेकदा कायदेशीर वाद उद्भवतात. अशा प्रत्येक प्रकरणात थेट अटकेची भीती दाखवणे हे व्यवसाय सुलभतेच्या (ईज ऑफ डुईंंग बिझनेस) मूलभूत संकल्पनेशी विसंगत होते. म्हणूनच सामान्य तांत्रिक अनियमितता आणि जाणीवपूर्वक केलेली संघटित करचुकवेगिरी यामध्ये स्पष्ट सीमारेषा आखली गेली पाहिजे. याचा अर्थ देशहिताला बाधा पोहोचवून करचोरी करणा-यांना पाठीशी घालावे असा अजिबात नाही. बोगस कंपन्या आणि गंभीर आर्थिक गैरव्यवहारांवर कठोर कारवाईची कायदेशीर चौकट भक्कम असायलाच हवी; परंतु, महसुलाच्या नावाखाली एखाद्या अधिका-याने केवळ संशयाच्या आधारावर स्थानिक व्यापा-याला गुन्हेगाराच्या पिंज-यात उभे करणे आता थांबले पाहिजे. जीएसटी लागू करण्यामागे संपूर्ण देशात अप्रत्यक्ष करांची एकसंध व्यवस्था निर्माण करण्याचा, करचुकवेगिरी रोखण्याचा आणि संपूर्ण करप्रणाली पारदर्शक बनविण्याचा उदात्त हेतू होता; पण ‘एक देश, एक कर’ ही घोषणा प्रत्यक्षात आणताना प्रारंभापासूनच काही मूलभूत मर्यादा कायम राहिल्या. कच्च्या तेलासह मुख्य पेट्रोलियम पदार्थ आजही जीएसटीच्या प्रत्यक्ष आकारणीबाहेर ठेवण्यात आले आहेत तर मानवी सेवनासाठीची मद्य उत्पादने राज्यांच्या स्वतंत्र अबकारी अखत्यारीतच ठेवण्यात आली आहेत. परिणामी, संपूर्ण देशासाठी परिपूर्ण एकसमान अप्रत्यक्ष करव्यवस्था निर्माण करण्याचे उद्दिष्ट अजूनही काही अंशी अपूर्णच राहिले आहे शिवाय, सुरुवातीच्या काळात नियमांमध्ये सातत्याने होणारे बदल, विवरण पत्रांमधील क्लिष्टता, परताव्यातील दिरंगाई आणि तांत्रिक अनुपालनाचा प्रचंड भार यांमुळे लहान आणि मध्यम उद्योजकांवर मोठा ताण आला होता.

-सी. ए. संतोष घारे, अर्थतज्ज्ञ

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये काळाचा घाला! जकणाळ तलावात पोहायला गेलेल्या २८ वर्षीय कामगाराचा बुडून मृत्यू
03:10
Video thumbnail
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या जागेचे पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन
00:46
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|काँग्रेसच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट! अखेर अपहरणाचा गुन्हा दाखल
02:24
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|पोलिसांनी दिलेला शब्द पाळला नाही? औराद पोलीस ठाण्यासमोर काँग्रेसचा ठिय्या
00:43
Video thumbnail
Nanded|नायगावमध्ये कापड दुकानाला भीषण आग! ३० लाखांचे नुकसान
01:25
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँक निवडणूक | जिल्हा बँकेच्या विकासासाठी शेतकरी संघटना मैदानात
18:58
Video thumbnail
Nanded|करखेली तलावात पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको! | चार गावांचा पाणीप्रश्न ऐरणीवर
01:40
Video thumbnail
Nanded|धर्माबादमध्ये उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा | आनंदराज आंबेडकरांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल
01:08
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये दिवाळीच्या रात्री ८ ठिकाणी आग! | ४० अग्निशमन जवानांचे शर्थीचे प्रयत्न
03:39
Video thumbnail
Latur Dcc Bank|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत मतदारांची पळवापळवी? |काँग्रेसचे SP अमोल तांबे यांना निवेदन
02:18
Video thumbnail
Latur Crime News|लातूरमध्ये पित्यानेच सात वर्षीय मुलाचा खून केल्याचा आरोप
03:41
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत खळबळ!कमलाकर शिंदे यांच्या अपहरणाचा आरोप |अरविंद पाटलांचे नाव चर्चेत
02:38
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पटवारी डेंटल क्लिनिकचे उद्घाटन | खासदार डॉ. शिवाजी काळगे यांचे रुग्णसेवेचे आवाहन
01:53
Video thumbnail
Yedshi Fire Accident | Dharashiv News|येडशीत भीषण आग! एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू
02:01
Video thumbnail
Uday Samant|उदय सामंत यांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना इशारा! | दुष्काळग्रस्तांना 2 हजार टँकर
07:10

Latest news