लातूर : प्रतिनिधी
केवळ डिग्री मिळवणे पुरेसे नाही, तर जीवनातील आव्हानांना यशस्वीपणे तोंड देऊन कुटुंबासाठी आधार बनणे अधिक महत्त्वाचे आहे. कोरोना काळात परिचारिकांची खरी गरज कळली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजुरांच्या लेकरांना रोजगार मिळावा, म्हणून पाच वर्षांपूर्वी जिजामाता नर्सिंग स्कूलची स्थापना करण्यात आली आहे. या स्कूलमध्ये शिक्षण घेण्या-या विद्यार्थ्यांनी केवळ डिग्री घेऊ नये, तर आयुष्याच्या परीक्षेत यशस्वी होऊन आई-वडिलांची सेवा करावी, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी केले.
जिजामाता नर्सिंग स्कूलमध्ये ‘एएनएम’ आणि ‘जीएनएम’च्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सव प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाचे सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे, डॉ. रमेश भराटे, नुसरत कादरी, प्रा. डॉ. संतोष जोहरी, प्राचार्य देविदास कोल्हे, भाऊसाहेब लाकाळ, प्राचार्या पूजा मोरे, प्रा. दत्ता मुंडे, प्रा. बाबासाहेब सोनवणे यांची उपस्थिती होती. यावेळी प्राचार्य केंद्रे म्हणाले, डॉक्टरांनी उपचार देऊन झाल्यानंतर रुग्णांची संपूर्ण सुश्रुषा करण्याचे महत्त्वाचे काम परिचारिका करतात.
डॉक्टरांपेक्षा रुग्ण हा जास्त वेळ परिचारिकाच्या देखभालीखाली असतो. यामध्ये केवळ महिलाच नाही तर पुरुष परिचारकही रुग्णसेवा देतात. कोरोना काळात नातेवाईक आपल्या रुग्णापासून दूर व्हायचे. मात्र, परिचारिकांनी रुग्णाला आईचे प्रेम देत समर्पणाच्या भावनेतून आरोग्यसेवा दिली. यावेळी डॉ. भराटे, प्राचार्य कोल्हे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. जोहरी यांनी केले. सूत्रसंचालन प्राचार्या मोरे यांनी केले तर आभार सुमित यादव यांनी मानले. यावेळी शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

