पूर्णा : चुडावा पोलिस ठाण्यातंर्गत सातेगाव-मीठापूर शिवारातील शिवरस्त्यावर मोकळ्या जागेत पत्त्यांवर पैसे लावून तिर्रट जुगार खेळल्या जाणा-या ठिकाणी परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर काही जण अंधाराचा फायदा घेत पसार होण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रकमेसह ११ मोटारसायकली व जुगाराचे साहित्य असा एकूण ६ लाख ७९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पोलिसांच्या माहितीनुसार, सातेगाव-मीठापूर शिवारातील शिवरस्त्यावर मोकळ्या जागेत काही जण एकत्र येऊन पत्त्यांवर पैसे लावून तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिस पथकाला मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला. यावेळी कंठीराम लक्ष्मणराव मस्के (वय ३१, रा. कंठेश्वर, ता. पूर्णा) आणि धोंडीबा नारायण सोनटक्के (वय ३४, रा. वाणी पिंपळगाव, ता. पालम) हे दोघे पोलिसांच्या हाती लागले. यावेळी पोलिसांची चाहूल लागताच इतर व्यक्तींनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढल्याचे पोलिसांनी सांगितले.
याकारवाईत पोलिसांनी ९ हजार ७०० रुपये रोख, विविध कंपन्यांच्या ११ मोटारसायकली (अंदाजे किंमत ६ लाख ७० हजार रुपये) आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ६ लाख ७९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चुडावा पोलिस ठाण्यात कंठीराम मस्के, धोंडीबा सोनटक्के यांच्यासह मोतीराम लांडे, शाहरुख, तुकाराम सालपे, सोमनाथ भोभळे, पिंटू कोमटवार, भागवत वैद्य, बाबू अंभोरे तसेच इतर पाच जणांचा उल्लेख करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार,ह्याव्हाण यांच्या सहभागाने करण्यात आली. या पथकात पोलिस हवालदार रंगनाथ दुधाटे, पोलिस शिपाई हनुमान ढगे, पोलिस हवालदार मुंढे, गायकवाड, हनवते, चालक पोलिस हवालदार इंगळे, पोलिस शिपाई राठोड व चालक पोलिस शिपाई बायनेवाड यांचा समावेश होता. पसार झालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे.
















