17.3 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeलातूरजेएसपीएमचे उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी

जेएसपीएमचे उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी

पालकांकडून खुनाचा आरोप; आक्रोश करीत नातेवाईकांचा ठिय्या 

पुरवणी जबाबात केली मागणी; पालकांकडून खुनाचा आरोप, नातेवाईक संतप्त
लातूर : प्रतिनिधी
माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर अध्यक्ष असलेल्या जयक्रांती शिक्षण प्रसारक मंडळद्वारा (जेएसपीएम) संचलित येथील जुन्या एमआयडीसी परिसरातील स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ वसतिगृहात अरविंद राजेभाऊ खोपे (रा. पांगरी, ता. परळी) या इयत्ता ७ वी वर्गात शिक्षण घेत असलेल्या १३ वर्षीय मुलाचा दि. २९ जुलै रोजी संस्थेतच संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात ‘जेएसपीएम’चे उपाध्यक्ष अजित शिवाजी पाटील कव्हेकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी फिर्यादी सहदेव गणपती तरकसे यांनी पुरवणी जबाबात केली असून त्यानुसार पोलिस तपास करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

‘जेएसपीएम’ संस्थेत अरविंद खोपे या अल्पवयीन मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. मुलाचा खून करण्यात आल्याचा आरोप करीत पालक व नातेवाईकांनी ‘जेएसपीएम’ संस्थेसमोर आक्रोश करीत ठिय्या मांडला. या घटनेने लातूर शहरात एकच खळबळ उडाली. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात ‘जेएसपीएम’ संस्थेत कर्तव्यावर असलेल्या टेकाळे व सूर्यवंशी नामक व्यक्तींवर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान अरविंदचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मंगळवारीच येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला गेला. परंतु अरविंदच्या मृतदेहाची स्कॅनिंग करावी आणि इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात यावे, अशी मागणी नातेवाईकांनी केल्याने अरविंदचे शवविच्छेदन बुधवारी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बुधवारी सकाळी ११.४५ च्या सुमारास अरविंदच्या मृतदेहाचे स्कॅनिंग करुन इन कॅमेरा शवविच्छेदन सुरु झाले. ते दुपारपर्यंत पूर्ण झाले. त्यानंतर अरविंदचे पालक व नातेवाईकांनी अरविंदच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी ‘जेएसपीएम’चे उपाध्यक्ष अजित शिवाजी पाटील कव्हेकर यांना जबाबदार धरुन त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा, जोपर्यंत ‘जेएसपीएम’च्या उपाध्यक्षांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली. यावेळी असंख्य सामाजिक कार्यकर्तेही उपस्थित होते. अरविंदचे पालक व नातेवाईक त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने एमआयडीसी पोलिसांनी सहदेव गणपती तरकसे रा. मोतीनगर लातूर यांचा पुरवणी जबाब दि. ३१ जुलै रोजी घेण्यात आला. अरविंदच्या मृत्यूस ‘जेएसपीएम’चे उपाध्यक्ष अजित शिवाजी पाटील कव्हेकर, प्राचार्य गोविंद शिंदे, त्यांचे सहकारी बिराजदार सर आणि सुरक्षा रक्षक (नाव माहित नाही) हे जबाबदार असून यांची नावे फिर्यादीत समाविष्ट करावीत, असा जबाब सहदेव तरकसे यांनी पुरवणी जबाबात दिला. पुरवणी जबाबानुसार पोलिस तपास करीत आहे.

दाखल सेक्शनप्रमाणे तपास सुरू
पोलिसांनी तरकसे यांचा पुरवणी जबाब नोंदवून घेऊन तसे पत्र एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन द्रोणाचार्य यांच्या स्वाक्षरीने अरविंदच्या पालकांना देण्यात आले.दरम्यान, पूर्वी दाखल गुन्ह्यातील सेक्शनप्रमाणे तपास सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन द्रोणाचार्य यांनी दिली.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR