मुंबई : प्रतिनिधी
भारताच्या निवडणूक आयोगातील अंतर्गत कामकाजाबाबत एका मोठ्या वृत्तपत्राने महत्त्वाची माहिती समोर आणली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यांच्या आयोगातील दोन निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या १० महिन्यांत आयोगाच्या विविध निर्णयांवर किमान १४ वेळा लेखी आक्षेप नोंदवल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे.
परंतु, आता या वृत्तानंतर मोठी खळबळ उडाली असून विरोधक आक्रमक झाले आहेत. अशातच आता या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आली आहे. सोशल मीडियावर राज ठाकरेंनी भली मोठी पोस्ट करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासह सरकारच्याही राजीनाम्याची मागणी केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी (२४ सप्टेंबर) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मोठी पोस्ट केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘इंडियन एक्स्प्रेस’ वर्तमानपत्राच्या कालच्या मुख्य पानावर निवडणूक आयोगासंदर्भातल्या बातमीने देशांत खळबळ उडवून दिली आहे.
२०२५ च्या अखेरीस, महापालिका निवडणुकांच्या आधी जेव्हा महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचे नेते आम्ही राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना आणि त्यांच्या सहका-यांना भेटायचो तेव्हाच लक्षात यायचे की यांना कुठलेच अधिकार नाहीत. हे मी जाहीरपणे अनेकदा बोललो आहे, निवडणूक आयोगाच्या कारभारावर मी आणि माझ्या पक्षाने उघडउघड शंका म्हणा, आरोप म्हणा काहीही म्हणा, पण ते आम्ही केलेत. आम्ही जे बोलत होतो त्याची सत्यता या बातमीत तुम्हाला सापडेल, असे त्यांनी पोस्टच्या सुरुवातीला म्हटले आहे.
राज्य निवडणूक आयोग सोडाच जिथे केंद्रीय निवडणूक आयोगातल्या २ आयुक्तांनाच गुंडाळून ठेवले आणि त्यांना अंधारात ठेवून किंवा त्यांच्या मताला अजिबात किंमत न देता जे निर्णय राबवले जात आहेत यावरून एक गोष्ट स्वच्छ आहे, निवडणूक आयोग स्वायत्त असायला हवा हे आता पुस्तकापुरते मर्यादित आहे. स्वायत्ततेची व्याख्या भारतीय जनता पक्षाच्या अधीन अशी असेल तर तो स्वायत्त आहे, अन्यथा नाही. निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी जे आक्षेप नोंदवले आहेत ते गंभीर आहेत, ते नाकारणे मुख्य निवडणूक आयुक्तांना म्हणजेच ज्ञानेश कुमारांना शक्य नाही, त्यामुळे ते जे वागले यामागचा कर्ताकरविता नक्की कोण होता, आहे इतकं सांगितलं तरी पुरेसं आहे, अशी मागणी ठाकरेंनी केली.
सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी या दोन निवडणूक आयुक्तांनी गेल्या १० महिन्यांत १४वेळा निवडणूक आयोगाच्या कारभारावर ऑन रेकॉर्ड ताशेरे ओढले आणि तरीही ढिम्मपणे निवडणूक आयोगाला जे करायचं होतं तेच त्यांनी केलं. बरं मुळात सध्या निवडणूक आयोगात एकूण तीन आयुक्त आहेत: एक मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि दोन निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू व विवेक जोशी. यातल्या दोघांनी आक्षेप नोंदवलेत. याचा अर्थ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे मनमानी करत निर्णय घेत होते असे चित्र समोर येते. पण खरं तर त्यांना ते निर्णय घ्यायला लावले जात होते. बरं हे १४ महिन्यांतले आक्षेप आहेत. ज्ञानेश कुमार यांची नियुक्तीच झाली फेब्रुवारी २०२५ ला म्हणजे आल्या आल्या त्यांनी त्यांच्या बॉसला खुश करायला सुरुवात केली, असेही ठाकरे म्हणाले.
















