खरगेंचा हल्लाबोल, इंडिया आघाडीने केले ६ आरोप
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष पराकोटीला पोहोचला आहे. कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी आज आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत विरोधकांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सार्वजनिक महाभियोग प्रस्ताव मांडला. या बैठकीत खरगे यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप करीत त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली.
सार्वजनिक महाभियोग कार्यक्रमासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, यूपीएच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह इंडिया आघाडीतील प्रमुख विरोधी पक्षनेते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनी भूषविले. मुख्य निवडणूक आयुक्तांवरील महाभियोग प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार म्हणाल्या की, लोकांना मतदान करण्यापासून रोखणे हा लोकशाहीवरील हल्ला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार निष्पक्ष नाहीत, असेही त्या म्हणाल्या.
यानंतर खरगे यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांचे काम स्वतंत्र नसून ते सत्ताधा-यांच्या दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप केला. मुख्य निवडणूक आयोगाविरुद्ध आपल्या मनात कोणताही वैयक्तिक द्वेष नाही, असे त्यांनी सांगितले. त्यांना निष्पक्ष निवडणुका हव्या आहेत, परंतु मुख्य निवडणूक आयोग पंतप्रधानांच्या सांगण्यावरून काम करत आहे, असे ते म्हणाले. आज मतदानाचा हक्क धोक्यात आला आहे, असे काँग्रेस अध्यक्ष खरगे म्हणाले. लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आपण आपली सर्व शक्ती पणाला लावू. एसआयआरच्या नावाखाली लोकांची मते रद्द केली जात असल्याचे त्यांनी म्हटले. संविधानाच्या निर्मात्यांनी जात किंवा धर्माच्या आधारावर कोणताही भेदभाव न करता सर्वांना मतदानाचा हक्क दिला आहे, असे ते म्हणाले.
ते जनता कधीही
विसरणार नाही
जर ज्ञानेशकुमार यांना वाटत असेल की मोदी आणि शाह वाचवतील तर देशात काय चालले आहे ते पाहा. लोकांचा मूड काय आहे? मी हमी देतो की रस्त्यावर उतरलेले लोक तुम्ही त्यांच्यासोबत जे केले ते कधीही विसरणार नाहीत. तुम्ही राष्ट्राच्या आत्म्यावर हल्ला केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या महाभियोगावर चर्चा करण्यासाठी संपूर्ण विरोधी पक्षाला बागेत बसावे लागत आहे. कारण इतर सर्व संस्था आमच्यासाठी बंद आहेत, अशा शब्दांत राहुल गांधींनी हल्लाबोल केला.
बैठकीत १९ पक्षांचे
२१५ खासदार उपस्थित
राजधानी दिल्लीत मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी आयोजित प्रातिनिधिक संसदेचे अधिवेशन ३ तास २३ मिनिटे चालले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोगाचा प्रस्ताव मांडला. त्यांच्यावर ६ आरोप ठेवण्यात आले. हा प्रस्ताव सर्व खासदारांनी मंजूर केला. काँग्रेससह १९ पक्षांचे २१५ खासदार सहभागी झाले होते. हे एक प्रतिकात्मक कृत्य आहे.
निवडणूक आयुक्तांवर
विरोधकांचे ६ आरोप
-निवडणूक चोरीचा कट
१३.२ कोटी मतदारांची नावे वगळली
-फॉर्म-६ मध्ये फेरफार
-ईसीआयएनईटीद्वारे मतदार याद्यांवर नियंत्रण
-इतर आयुक्तांकडे दुर्लक्ष
-सत्ताधा-यांच्या सांगण्यावरून काम
रामलीला मैदानावर
आज महारॅली
केंद्रीय निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारच्या कारभाराविरोधात इंडिया आघाडीने व्होट चोरी आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाचा पुढील टप्पा १ नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर एका मोठ्या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
















