दावोस : प्रतिनिधी
स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीच्या निमित्ताने करण्यात येणारा दावोस दौरा हा भारतात आणि पर्यायाने महाराष्ट्रात ज्ञान, तंत्रज्ञान आणि विदेशी गुंतवणूक मिळविण्यासाठीचा महत्त्वाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. दुस-या दिवशी तिस-या मुंबईतील पहिले शहर म्हणून रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा करण्यात आली.
आज प्रामुख्याने धोरणात्मक असे सामंजस्य करार करण्यात आले. ज्यामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, युनिव्हर्सिटी ऑफ बर्कले, टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक, अर्बन फ्युचर्स कलेक्टिव्ह -लंडन, आयसीसीआय-इटली, अँलाँग ट्युनिंग इन्स्टिट्यूट, नॉर्वेजीयन जिओ टेक्निकल इन्स्टिट्यूट, अर्बन प्लॅनिंगमधील सुबाना जुराँग-सिंगापूर यांच्यासोबत टेक्निकल सामंजस्य करार केले आहेत. यातून एक प्रकारे केवळ गुंतवणूक नाही, तर ज्ञान आणि तंत्रज्ञानातून मोठ्या प्रमाणात उद्योग आणता येतील, वेगवेगळ्या क्षेत्रात चांगल्यारीतीने काम करता येईल. अर्बन प्लॅनिंग, ट्रान्सपोर्टशी संबंधित करारांमुळे प्रत्येक शहरातील वाहतूक सुविधांची संरचना चांगल्या रीतीने करता येणार आहे.
दावोस दौ-यातून नॉलेज-ज्ञान, टेक्नॉलॉजी-तंत्रज्ञान आणि एफडीआय-विदेशी गुंतवणूक मिळविता येते. त्याचा देशाला आणि पर्यायाने राज्याला मोठा फायदा होतो. यंदा नागरी क्षेत्रातील नियोजन आणि परिवहन व्यवस्थेच्या दृष्टीने या क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांशी संवाद, समन्वय साधता आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी मेडटेक सहकार्य
राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार आणि तत्पर आरोग्य सुविधा पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने यंदा दावोसमध्ये मेडिकल-टेक्नॉलॉजीबाबत एका सत्रात चांगली आणि सकारात्मक चर्चा केल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यातून राज्यातील आरोग्य सुविधांसाठीचा रोडमॅप निश्चित करण्यात आला. यातून आपला राज्यात मेड-टेक स्टार्टअपची चांगली इकोसिस्टिम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी जगातील अशी सुविधा उभ्या करणा-या सर्वोत्तम कंपनीशी करार करण्यात आला आहे.
नवीन बिझनेस डिस्ट्रिक्टची निर्मिती
नवी मुंबई विमानतळापासून पंधरा ते वीस किलोमीटरवर हे ग्रोथ सेंटर निर्माण करण्यात येणार आहे. त्याबाबत दावोसमध्ये घोषणा करण्यात आली. गेल्या तीन-चार वर्षांपासून यासाठीच्या परवानग्या मिळविण्यात येत होत्या. त्या मिळाल्यानंतर आज या तिस-या मुंबईतील पहिल्या शहराची घोषणा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
याठिकाणी प्लग अँण्ड प्ले या धर्तीवर रेडी टू स्टार्ट पद्धतीने संबंधित घटक लगेच कामकाज सुरू करू शकणार आहेत. ही देशातील पहिली कंपनी, यामध्ये खासगी-सार्वजनिक भागीदारी (पीपीपी) प्रकल्प असणार आहे. यात शासन, एमएमआरडीए आणि खासगी घटक एकत्र येऊन काम करतील. याठिकाणी नवीन बिझनेस डिस्ट्रिक्ट तयार करण्यात येत आहे. याठिकाणी चांगल्या पगाराच्या नोक-या तसेच ग्लोबल कॅपिसिटी सेंटर्स, फिनटेकची इकोसिस्टम तयार होईल. बीकेसीच्या धर्तीवर याठिकाणी बिझनेस डिस्ट्रिक्ट स्थापन होईल. या शहराच्या घोषणेनंतर सुमारे एक लाख कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार देखील झाले आहेत.
यासाठी जगातील दिग्गज अशा कंपन्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्यामध्ये रिपब्लिक ऑफ कोरियाचा हवाना ग्रुप, स्वित्झर्लंडमधून एसएसबी ग्रुप, एन्सार, फेडेक्स हे अमेरिकेतील समूह, फिनलंडचा रिव्हर रिसायकल समूह, दुबईचा एमजीएसए समूह, सिंगापूरचा स्पेसेस होल्डिंग मेपल ट्री, जीनव्ही आणि इंडोस्पेस पार्क समूह, अमेरिकेतून ट्रिबेका डेव्हलपर्स. या विदेशी गुंतवणुकीतून एक खूप चांगले शहर तयार होईल. याठिकाणी ‘वॉक टू वर्क’ अशा पद्धतीने सुविधा निर्माण होतील. अशा रीतीने तिस-या मुंबईतील पहिले शहर आता प्रत्यक्षात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले.
उद्योजक, गुंतवणूकदारांच्या आवर्जून भेटी
दरम्यान, दावोसमध्ये साकारण्यात आलेले मॅग्नेटिक महाराष्ट्राचे पॅव्हेलियन आकर्षणाचे केंद्र राहिल्याचे चित्र होते. या पॅव्हेलियनला विविध क्षेत्रातील उद्योजक, गुंतवणूकदारांसह, भारतातील मान्यवरांनी आवर्जून भेट दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्यासह महाराष्ट्राच्या प्रतिनिधी मंडळाने सर्व मान्यवरांचे स्वागत केले. दरम्यान, दावोस दौ-यावर आलेल्या भारताच्या रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची इंडिया पॅव्हेलियनमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी सदिच्छा भेट घेऊन, त्यांना शुभेच्छा दिल्या.
जागतिक बँकेचे अध्यक्ष बंगा यांच्याशी चर्चा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांच्याशी चर्चा केली. यामध्ये महाराष्ट्रात हरित औद्योगिक पट्टा (ग्रीन इंडस्ट्रीयल कॉरिडॉर) विकसित करण्याच्या अनुषंगाने चर्चा झाली. यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक येऊ शकते.
बर्मुडाचे पंतप्रधान बर्ट यांच्याशी संवाद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बर्मुडाचे पंतप्रधान डेव्हिड बर्ट यांची भेट झाली. या भेटीत उभयतांनी विविध विषयांवर चर्चा केली. सर्वसमावेशक विकास, लोकाभिमुखता आणि विकास क्षेत्रातील नावीन्यपूर्णता या अनुषंगाने धोरणात्मक चर्चा झाली. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी आणि जगभरातील विविध घटकांच्या दृष्टीने स्वागतशील भूमिका घेऊन सज्ज आहे. यातून पारदर्शक, विश्वासार्ह आणि दीर्घकालीन अशी व्यवस्था निर्माण होणे अपेक्षित आहे. अशा संवादातून एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील दृढ संबंध प्रस्थापित होतील.

