ठाणे : प्रतिनिधी
ज्येष्ठ मराठी अभिनेत्री उषा चव्हाण यांना शासनाने २०२४ साली व्ही. शांताराम पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता. पण आता हाच पुरस्कार शासनाला पुन्हा परत करण्याची वेळ उषा चव्हाण यांच्यावर आली आहे. पुण्यातील टीडीआर प्रकरणी न्यायालयाचा निकाल त्यांच्या बाजूने लागला असतानाही त्यांना न्याय मिळत नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.
ज्येष्ठ मराठी अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्र शासनाकडून त्यांना मिळालेला व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार त्यांनी शासनाला परत केला आहे. ठाण्यातील आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर त्यांनी शासनाने दिलेला पुरस्कार परत केला आहे.
पुण्यातील जमिनीचा टीडीआर शासनाकडून मिळत नसल्याने संतप्त उषा चव्हाण यांनी पुरस्कार परत केला आहे. याप्रकरणी पुणे महापालिका आयुक्तांच्या (नवल किशोर राम) विरोधात राग व्यक्त केला.
‘टीडीआरचे सर्व खाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्याबाबतची प्रत्येक कागदपत्रं मी त्यांना पाठवलेली आहेत. पुणे महापालिका आयुक्तांच्या नावात शेवटी राम आहे, पण ते राम नाहीत. ते बेकायदेशीर करत आहेत, याची सर्वांनी नोंद करून घ्यावी, असे म्हणत उषा चव्हाण यांनी नाव न घेता पुणे आयुक्तांवर संताप व्यक्त केला. ‘माशी हलणार नाही असे बघत बसतात, पण उत्तर देत नाहीत. त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे की, ते स्वत:च्या मर्जीने ठरवून बोलत आहेत, असेही उषा चव्हाण यावेळी म्हणाल्या.
पुण्यातील टीडीआर प्रकरणी न्यायालयाचा निकाल त्यांच्या बाजूने लागला असताना देखील न्याय मिळत नसल्याने त्यांनी शासनाचा हा पुरस्कार परत केला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांची देखील आपण भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
















