गुजरातमधील केवडिया येथे २२ सप्टेंबर रोजी गौरव
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने २०२४ सालच्या दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्याच्या नावाची घोषणा आज केली. निवड समितीच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने दिग्गज कन्नड अभिनेते अनंत नाग यांना यंदाच्या मानाच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केली. भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ आणि उल्लेखनीय योगदानाची दखल घेत नाग यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ही घोषणा होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनंत नाग यांचे अभिनंदन केले.
दिग्गज अभिनेते अनंत नाग यांनी त्यांच्या प्रदीर्घ चित्रपट कारकिर्दीत विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले. आपल्या अभिनयाचे नाणे खणखणीत वाजवत त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. २२ सप्टेंबर २०२६ रोजी ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ््यादरम्यान अनंत नाग यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. गुजरातमधील केवडिया येथील एकतानगर येथे हा सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.
दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी अनंत नाग यांचे नाव जाहीर होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून त्यांचे अभिनंदन केले. अनेक दशकांपासून आपल्या सहजसुंदर अभिनयाने, उत्कृष्ट अभिनयकौशल्याने आणि अष्टपैलू प्रतिभेने त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीवर, विशेषत: कन्नड चित्रपटसृष्टीवर, खोलवर प्रभाव पाडला. त्यांनी साकारलेल्या प्रत्येक व्यक्तिरेखेत एक वेगळी खोली आणि वास्तवतेची झलक पाहायला मिळते, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये काढले.
अनंत नाग यांचे नाव अनंत नागरकट्टे असे आहे. त्यांना चित्रपटसृष्टीत अनंत नाग या नावाने ओळखले जाते. ४ सप्टेंबर १९४८ रोजी कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील शिराली येथे त्यांचा जन्म झाला. मुंबईत शिक्षण घेत असताना त्यांची अभिनयातील आवड वाढत गेली. १९६० च्या दशकाच्या अखेरीस कन्नड, कोंकणी, मराठी आणि हिंदी नाटकांमधून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी रंगभूमीवरील अनंत नाग यांच्या अभिनयाची प्रतिभा ओळखली. १९७४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अंकुर’ या चित्रपटातून त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर १९७० आणि १९८० च्या दशकातील समांतर सिनेमातील ते एक परिचित नाव बनले. श्याम बेनेगल यांच्या ‘निशांत’, ‘मंथन’ आणि ‘भूमिका’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या.
भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी अनंत नाग यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. २०२५ साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्याव्यतिरिक्त अनेक वेळा कर्नाटक राज्य चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर अॅवॉर्ड्स साऊथ पुरस्कारही जिंकले.
‘मालगुडी डेज’ मुळे
घराघरांत पोहोचले नाव
अनंत नाग यांच्या कारकिर्दीत ‘मालगुडी डेज’ या मालिकेचेही विशेष स्थान आहे. आर. के. नारायण यांच्या कथांवर आधारित या लोकप्रिय दूरदर्शन मालिकेचे दिग्दर्शन त्यांचे धाकटे बंधू शंकर नाग यांनी केले होते. या मालिकेमुळे ते घराघरांत पोहोचले. नाग यांना देशभरातील प्रेक्षकांमध्ये वेगळी ओळख मिळाली.
















