पुणे : प्रतिनिधी
देशातील पर्यावरण चळवळीला दिशा देणारे, निसर्ग आणि माणसातील नातं जपण्याचा सातत्याने आग्रह धरणारे ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले. अल्पशा आजाराने पुण्यातील डॉ. शिरीष प्रयाग हॉस्पिटल येथे मंगळवारी (७ जानेवारी) रात्री ११ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने पर्यावरण संवर्धन, जैवविविधता आणि शाश्वत विकासासाठी आयुष्यभर काम करणारा एक निर्भीड विचारवंत देशाने गमावला आहे.
डॉ. गाडगीळ हे केवळ शास्त्रज्ञ नव्हते, तर पर्यावरणाकडे पाहण्याची समाजाची दृष्टी बदलण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. निसर्गाचा उपभोग घेताना त्याचे रक्षणही तितकेच महत्त्वाचे आहे, ही भूमिका त्यांनी स्पष्ट शब्दांत मांडली. विशेषत: पश्चिम घाटातील जैवविविधता, जंगलांचे संरक्षण आणि स्थानिक लोकांच्या सहभागातून होणारा विकास या मुद्द्यांवर त्यांनी ठाम भूमिका घेतली आहे.
डॉ. माधव गाडगीळ यांचे नाव देशातील पर्यावरण चळवळीशी घट्टपणे जोडले गेले आहे. पश्चिम घाट संवर्धनासाठी स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीचे ते अध्यक्ष होते. या समितीच्या अहवालामुळे पर्यावरण संरक्षण आणि विकास यामधील समतोलावर देशभरात मोठी चर्चा सुरू झाली. निसर्गसंपत्तीचा अतिरेकाने वापर केल्यास भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी वेळोवेळी दिला. डॉ. माधव गाडगीळ यांच्या निधनावर पर्यावरणप्रेमी, अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतून तीव्र शोक व्यक्त केला जात आहे. पर्यावरणासाठी निर्भीडपणे भूमिका मांडणारा, अभ्यासू आणि संवेदनशील विचारवंत काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

