माजी खासदार डॉ. जे. एम. वाघमारे यांचे निधन, आज कवठा येथे अंत्यसंस्कार
लातूर : प्रतिनिधी
राज्यसभेचे माजी खासदार, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू, तत्कालीन लातूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत तथा राजर्षी शाहू महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. जनार्दन वाघमारे यांचे दि. २ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजता निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार, दि. ३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता औसा तालुक्यातील कवठा येथे त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने शिक्षण, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनातील एक ज्येष्ठ, अभ्यासू व वैचारिक नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले.
लातूर येथील श्रमसाफल्य सोसायटीत डॉ. जनार्दन वाघमारे राहात होते. काही दिवसांपूर्वी ते घरात पडले होते. त्यांच्या मेंदूला जबर दुखापत झाल्याने ते बेशुद्ध अवस्थेत होते. २० दिवसांपूर्वी त्यांना दवाखान्यातून घरी आणले आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. दि. २ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. जनार्दन वाघमारे यांनी आयुष्यभर शिक्षण, सामाजिक परिवर्तनाच्या कार्यासाठी स्वत:ला वाहून घेतले. शिक्षणतज्ज्ञ, साहित्य अभ्यासक आणि राजकारणी म्हणून त्यांनी राज्यात व देशात स्वतंत्र ओळख निर्माण केली. इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक म्हणून त्यांनी दीर्घकाळ अध्यापन केले. लातूरमध्ये विद्यार्थी घडवितानाच त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान देत शिक्षणाचा लातूर पॅटर्न निर्माण केला.
लातूरमध्ये जनतेतून निवडून आलेले ते पहिले नगराध्यक्ष ठरले. ते राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. त्यामुळेच त्यांना राज्यसभेतही खासदार म्हणून संधी मिळाली आणि त्या संधीचे सोने करीत त्यांनी राज्यसभेत शिक्षण, सामाजिक न्याय आणि वंचित घटकांच्या प्रश्नांवर प्रभावी भूमिका मांडत वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.
औसा तालुक्यातील कवठा येथे दि. ११ नोव्हेंबर १९३४ रोजी त्यांचा जन्म झाला. ते १९७० ते १९९४ या काळात लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयात प्राचार्य होते. १७ सप्टेंबर १९९४ ते १६ सप्टेंबर १९९९ या काळात ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू होते. दि. १७ डिसेंबर २००१ ते १६ डिसेंबर २००६ या काळात ते लातूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष होते. २००८ ते २०१४ या कालावधीत ते राज्यसभेचे सदस्य राहिले. शिवाय त्यांनी त्यांच्या जीवनात अनेक समित्यांवर सदस्य म्हणून काम केले. त्यांनी १०० पेक्षा अधिक ग्रंथ लिहिले आहेत. त्यांनी अमेरिका, इंग्लिंड, कॅनडा, श्रीलंका आदी देशांचा अभ्यास दौरा केलेला आहे. १९८२ साली त्यांनी भारताचे प्रतिनिधी म्हणून युनोत केलेले भाषण अभ्यासपूर्ण होते. त्यांच्या पार्थिवावर आज दि. ३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता औसा तालुक्यातील कवठा (लातूर-बाळगाव रोडवरील पानचिंचोलीजवळ) येथे त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा जितेंद्र, मुलगी प्रा. सूचेता, अस्मिता या दोन मुली, जावई राजेंद्र शास्त्री, नातू असा परिवार आहे.
विपूल लेखन
डॉ. जे. एम. वाघमारे यांनी विविध विषयांवर विपूल लेखन केले. निग्रो साहित्य, दलित साहित्य आणि पुरोगामी साहित्य चळवळीवर त्यांनी सखोल अभ्यासपूर्ण लेखन व संशोधन केले. सामाजिक न्याय, समता आणि परिवर्तनवादी विचारसरणी यांवर त्यांनी परखड मांडणी केली.
डॉ. वाघमारे यांची ग्रंथसंपदा
-अमेरिकन निग्रो : साहित्य आणि संस्कृती
-महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण
-हाक आणि आक्रोश
-शिक्षण : समाज परिवर्तन आणि राष्ट्रीय विकास
-प्राथमिक शिक्षण : यशापयश आणि भवितव्य
साहित्यचिंतन
* आजचे शिक्षण : स्वप्न आणि वास्तव
* समाज परिवर्तनाच्या दिशा
* समाज परिवर्तन की दिशाएँ (अनुवादित)
* चिंतन एका कुलगुरुचे

