रांची : वृत्तसंस्था
झारखंडमधील राजकारण सध्या देशाच्या केंद्रस्थानी आले आहे. माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा पक्ष सोडण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी एक निवेदन जाहीर करून आपल्यासमोर तीन पर्याय असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ते कोणता मार्ग पत्करतात याबाबत उत्सुकता आहे.
चंपाई सोरेन यांनी म्हटले की, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेताना त्यांच्यासोबत अपमान झाला. आता त्यांच्यासमोर फक्त तीन पर्याय आहेत. एक, राजकारणातून निवृत्ती घेणे, दुसरा, स्वत:ची संघटना सुरु करणे आणि तिसरा दुस-या एखाद्या संघटनेसोबत जाणे. यातील तिसरा पर्याय ते अवलंबवण्याची दाट शक्यता आहे.
भाजपमध्ये जाण्यात दोन अडचणी
१. झारखंडमध्ये भाजप दुस-या क्रमांकाचा पक्ष आहे. चंपाई सोरेन यांचा दिल्ली दौरा देखील झाला. पण, भाजपमध्ये आधीच तीन माजी मुख्यमंत्री रांग लावून असल्याने भाजप त्यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करेल काय? याबाबत प्रश्न आहे.
२. मुख्यमंत्री हेमंत सोरेन वारंवार भाजपवर पक्ष फोडण्याचा आरोप करत आहेत. चंपाई सोरेन भाजपमध्ये गेल्यास त्यांच्या या आरोपाला बळकटी मिळेल. विधानसभेसाठी हेमंत सोरेन यांना हा चांगला मुद्दा मिळू शकतो. मात्र, चंपाई सोरेन यांना पक्षात घेऊन भाजप त्यांना केंद्रात घेऊ शकते. त्यांना एका राज्याचा राज्यपाल देखील केले जाऊ शकते.
चंपाई हे कोल्हान भागातील प्रमुख नेते आहेत. २०१९ मध्ये याठिकाणी झामुमोला १४ पैकी ११ जागा मिळाल्या होत्या. दरम्यान, चंपाई सोरेन यांची राजकीय कारकीर्द शिबू सोरेन यांच्या सानिध्यातच झाली. त्यांनी पहिल्यांदा १९९१ मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यानंतर २००० सोडले तर ते नेहमी जिंकत आले आहेत. त्यांनी राज्यात मंत्रिपद देखीस सांभाळले आहे. झामुमोमधील ते प्रमुख नेते आहेत. त्यामुळे त्यांना हेमंत सोरेन तुरुंगात गेल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती.
महाराष्ट्राप्रमाणे शिंदे पॅटर्न!
चंपाई सोरेन यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांच्यासमोर नवा पक्ष स्थापन करण्याचा देखील पर्याय आहे. झामुमो आणि काँग्रेसमधील नाराज नेत्यांना घेऊन ते स्वत:चा पक्ष स्थापन करू शकतात. स्वत:चा पक्ष घेऊन ते विधानसभा लढले तर ते किंगमेकरच्या भूमिकेत जाऊ शकतात.अशावेळा महाराष्ट्राप्रमाणे शिंदे फॉर्म्युलानुसार त्यांना मुख्यमंत्री केले जाऊ शकते.