यवतमाळ : प्रतिनिधी
झोपेत असताना सर्पदंश झाल्याने ११ वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील माणूसधरी येथे ही घटना घडली असून, आर्यन चंद्रकांत तुम्मावार असे मृत मुलाचे नाव आहे.
पहाटे सुमारे पाचच्या सुमारास आर्यन घरात झोपलेला असताना सापाने त्याच्या कानाला दंश केला. सुरुवातीला एखादा किडा चावला असावा असे वाटल्याने कुटुंबीयांच्या ही सर्पदंशाची बाब लक्षात आली नाही. मात्र, काही वेळाने आर्यनची प्रकृती खालावू लागल्याने कुटुंबीयांनी त्याला तातडीने घाटंजी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याची गंभीर प्रकृती पाहता, वैद्यकीय अधिका-यांनी त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. यवतमाळ येथे उपचारादरम्यान आर्यनची प्राणज्योत मालवली. आर्यनला दंश करणारा साप हा अतिविषारी ‘मण्यार’ जातीचा असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
आर्यन हा माणूसधरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पाचवीमध्ये शिकत होता. त्याचा अचानक असा सर्पदंशाने मृत्यू झाल्याने शाळा, शिक्षक आणि वर्गमित्रांवर शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून तुम्मावार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
















