लातूर : प्रतिनिधी
सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे इंदूर येथे ७ व ८ ऑक्टोबर २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय सोया कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला देश-विदेशातील आघाडीच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी उपस्थित राहून सोयाबीन उत्पादन, प्रक्रिया आणि विपणनासंबंधी विचारमंथन केले. ८ ऑक्टोबर रोजी इंदूर येथील ब्रिलियंट कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित सन्मान सोहळ्यात, टी. पी. शेनॉय यांना ‘आयकॉन ऑफ सोय व्हॅल्यू चेन’ हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्काराचा गौरवपत्रात नमूद करण्यात आले आहे की, ‘‘लघुधारक शेतक-यांना उत्पादन साखळीत प्रभावीरीत्या सामावून घेणे, मराठवाड्याला देशातील महत्त्वपूर्ण सोयाबीन उत्पादन केंद्र म्हणून विकसित करणे आणि नाविन्यपूर्ण मूल्यसाखळी मॉडेल्सची उभारणी करणे’’ या त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार डॉ. दविष जैन, अध्यक्ष, सोपा यांनी प्रदान केला. यावेळी श्री. नरेश गोयंका (उपाध्यक्ष, सोपा), डी. एन. पाठक (कार्यकारी संचालक, सोपा), प्रा. विजय पॉल शर्मा आणि डॉ. गोपालकृष्ण सुद आदी मान्यवर उपस्थित होते.
शेनॉय यांनी जवळपास २५ वर्षे एडीएम अॅग्रो इंडस्ट्रीज इंडिया प्रा. लि. येथे हेड ऑफ अॅग्रो सर्व्हिसेस म्हणून कार्यभार सांभाळला. महाराष्ट्र राज्याच्या एकूणच आणि विशेषत: मराठवाडा विभागाच्या सोयाबीन उत्पादन क्षेत्रातील उल्लेखनीय वाढ ही त्यांच्या नेतृत्वाखालील एडीएमच्या टीमच्या प्रयत्नांमुळे शक्य झाली.
लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यांमधील सोयाबीन क्षेत्रात झालेली अफाट वाढ, तसेच राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त उत्पादकता मिळविण्याचे श्रेय हे शेनॉय यांच्या नेतृत्वाखालील एडीएम टीमला जाते. शेनॉय यांनी नवी दिल्ली येथील फिक्कीच्या कृषी समितीवर, सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया च्या व्यवस्थापन समितीवर तसेच महाराष्ट्रातील सोयाबीन मूल्यसाखळीशी संबंधित विविध सल्लागार गटांवरही महत्त्वपूर्ण काम पाहिले आहे.
याशिवाय त्यांना वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम तर्फे त्यांच्या ‘न्यू व्हिजन फॉर अॅग्रीकल्चर २०२०’ या जागतिक प्रकल्पाच्या अंमलबजावणीत ‘व्हिजन लीडर’ म्हणून सलग तीन वर्षे निमंत्रित करण्यात आले होते. शेनॉय यांनी हा सन्मान आपल्या टीमला समर्पित केला असून, प्रगतिशील शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्वयंसेवी संस्था, एडीएम, राज्य कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे तसेच महाराष्ट्र राज्यातील कृषी व शेतकरी कल्याण विभाग यांचेही आभार मानले.
















