मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने काल अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी मैदानावर झालेल्या टी२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात न्यूझिलंडचा पराभव केला. याबरोबरच भारताने सलग दुस-यांदा टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात न्यूझीलंडच्या संघाला एकतर्फी सामन्यात पराभूत करत विक्रमी ३ वेळा टी-२० विश्वचषक जिंकणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. यानंतर सर्व स्तरातून भारतीय संघाचे कौतुक केले जात आहे. यादम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आयसीसी टी२० वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये पुन्हा एकदा भारतीय संघाने भारताचा तिरंगा झेंडा फडकवला आहे. भारत पुन्हा चॅम्पियन झालेला आहे, काल अनेक रेकॉर्ड तोडत ज्या प्रकारे न्यूझीलंडचा पराभव भारताने केला, टी२० सामन्यांच्या इतिहासात फायनलमध्ये अशा प्रकारचा स्कोअर करणं आणि समोरच्या टीमला अशा प्रकारे गारद करणं हे देखील नवीन रॅकॉर्ड आहे.
काल संजू सॅमसन, अभिषेक शर्मा यांनी ज्या प्रकारे बॅटिंग केली त्यामुळे एक अतिशय सॉलिड फाउंडेशन भारताला मिळालं. बॉलिंगमध्येही जसप्रीत बुमराह यांनी ज्या प्रकारे पूर्ण सिरीजमध्ये, अतिशय इकॉनॉमीने बॉलिंग केली. कालही त्यांनी ज्या प्रकारे न्यूझीलंडच्या टीमला गारद केलं, ते विलक्षण अशी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली.
अर्थात एकूणच टीमचा परफॉर्मन्स उत्तम राहिला आहे. केवळ एक सामना आपण हारलो, बाकी कुठल्याच सामन्यात आपण पराजित झालो नाही. एक स्पष्ट विजय आपल्या संघाने मिळवला आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादव आणि संपूर्ण टीम या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आपल्या मुंबईच्या खेळाडूंनी देखील या टीममध्ये उत्तम खेळ केला, त्यामुळे शिवम, सूर्या अलकीव या सगळ्यांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

