व्हिसा शुल्कात १० पट वाढ, एच-१ बी व्हिसा शुल्क आता ८८ लाखांवर
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी भारतावर ५० टक्के टॅरिफ लादले. आता ट्रम्प यांनी व्हिसा बॉम्ब टाकत एच-१ बी व्हिसाच्या शुल्कात तब्बल १० पट वाढ करून आता हे शुल्क १ लाख अमेरिकन डॉलर्स एवढे केले. यापूर्वी हे शुल्क १ हजार अमेरिकन डॉलर्स होते. त्यामुळे या आधी एका वर्षासाठी एच-१ बी व्हिसासाठी ८८ हजार रुपये भरावे लागत होते. आता तब्बल ८८ लाख रुपये मोजावे लागणार असल्याने अमेरिकेत शिक्षण किंवा नोक-यांसाठी जाणे जवळपास अशक्य होणार आहे. भारतासाठी हा फार मोठा धक्का आहे.
ट्रम्प सरकारच्या नव्या निर्णयामुळे आता एच-१ बी व्हिसा मिळविण्यासाठी नवीन अर्जदारांना आणि जुन्या व्हिसाधारकांना नूतनीकरणासाठी तब्बल १ लाख डॉलर्स म्हणजे ८८ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. हा निर्णय भारतीयांसाठी मोठी आर्थिक अडचण ठरू शकतो. एका अंदाजानुसार सुमारे ५० लाख भारतीय अमेरिकेत राहतात तर १० लाख भारतीय ग्रीन कार्डच्या प्रतीक्षेत आहेत. आता या भारतीयांसाठी अमेरिकन व्हिसा मिळविणे आणि नूतनीकरण प्रक्रिया अधिक खर्चिक बनली आहे. त्यामुळे लाखो भारतीयांना याची झळ सोसावी लागणार आहे. हा नियम नवीन व्हिसासाठी लागू आहे. पण आधीपासून ज्यांच्याकडे व्हिसा आहे किंवा नूतनीकरण करणा-यांना हे शुल्क लागू नसेल, असे सांगण्यात आले.
गणित, आयटी, वैद्यकीय क्षेत्रात काम करणा-या कंपन्यांना परदेशी कामगार नियुक्त करण्यासाठी व्हिसा देण्याची परवानगी असते. या व्हिसाला एच-१ बी व्हिसा म्हणतात. पूर्वी या व्हिसासाठी कंपनीला फक्त १ हजार डॉलर म्हणजे ८८ हजार रुपये मोजावे लागायचे. त्यामुळे कमी खर्चात भारतीयांना नोकरी आणि शिक्षणासाठी जाण्याची संधी होती. मात्र, आता ट्रम्प सरकारने एच-१ बी व्हिसाची किंमत तब्बल १ लाख डॉलर केल्याने भारतीयांना मोठी किंमत मोजावी लागणार आहे.
अमेरिकेकडून विदेशी नागरिकांना देण्यात येणा-या एच-१ बी व्हिसापैकी ७१ टक्के व्हिसा भारतीयांना देण्यात येतो. मात्र, आता ट्रम्प यांनी याचे शुल्क १० पटीने वाढविल्याने भारतीय कामगार नियुक्त करणे कुठल्याच कंपनीला परवडणार नाही. डोनाल्ड ट्रम्प या निर्णयातून अमेरिकेतील स्थानिक तरुणांना रोजागारामध्ये प्राधान्य देण्याच्या प्रयत्नात आहेत. याचा मोठा फटका भारताला बसणार आहे. यामुळे एक तर अमेरिकेत नोकरीच्या संधी कमी होतील आणि अमेरिकन विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण किंवा पीएचडी पदवी घेणेही कठीण होणार आहे. विशेषत: भारताच्या आयटी सेक्टरवर याचा मोठा परिणाम होणार आहे.
भारतीयांचे मोठे नुकसान
एच-१ बी व्हिसामुळे मोठ्या प्रमाणात भारतीय तरुणांना अमेरिकेत नोक-या मिळायच्या. सुंदर पिचाईसारख्या अनेक कंपन्यांच्या सीईओंची सुरूवात याच एच-१ बी व्हिसावर अमेरिकेत झाली. मात्र, व्हिसाचे शुल्क १० पट वाढविल्याने भारतीयांचे स्वप्न जवळपास संपल्यात जमा आहे.
परकीय चलनालाही फटका!
भारतात येणा-या परकीय चलणावरही एच-१ बी व्हिसाचा मोठा परिणाम होणार आहे. कारण भारतातून अमेरिकेत जाऊन काम करणा-यांची संख्या ८० लाखपेक्षा जास्त आहे. त्यांनी कमाई केल्यानंतर त्यांच्या संपत्तीचा काही भाग डॉलरच्या रुपाने मायदेशी पाठवतात. मात्र, आता भारतीयांना अमेरिकेत नोकरीची संधी कमी झाल्यास भारतात येणा-या डॉलर्समध्येही घट होऊ शकते.
















