अमेरिकन सुप्रीम कोर्टाचा डोनाल्ड ट्रम्प यांना दणका
न्यूयॉर्क : वृत्तसंस्था
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुस-या देशांवर मनमानी पद्धतीने अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा धडाका लावला होता. त्यामुळे जगभर खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे जगभरातून विरोध होत असतानाही ट्रम्प यांनी आपला हेका सोडला नव्हता. याच्या झळा भारतालाही सोसाव्या लागल्या. वाढीव टॅरिफला सर्वच देशांतून विरोध होत असताना ट्रम्प यांच्या मनमानीला अमेरिकन सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. अखेर अमेरिकन सुप्रीम कोर्टाने आज ट्रम्प यांना मोठा धक्का देत दुस-या देशांवर लादलेले टॅरिफ बेकायदेशीर ठरविले. विशेष म्हणजे राष्ट्राध्यक्षांना हा अधिकार नाही, अशा स्पष्ट शब्दांत अमेरिका सुप्रीम कोर्टाने डोनाल्ड ट्रम्प यांना फटकारले.
राष्ट्रीय आपत्कालीन स्थितीत लागू करण्यात येणा-या कायद्याचा वापर करत ट्रम्प यांनी इतर देशांवर वाढीव टॅरिफ लादले. या निर्णयाच्या झळा अनेक देशांना सोसाव्या लागल्या. विशेष म्हणजे या निर्णयाला विरोध होत असतानाही ट्रम्प यांनी थेट धमक्या देऊन निर्णयाचा धडाका सुरू ठेवला होता. मुळात अमेरिकेच्या संविधानानुसार कर आणि टॅरिफ लादण्याचा अधिकार राष्ट्रपतींना नसून काँग्रेस म्हणजेच संसदेला मिळालेला आहे. मात्र, ट्रम्प यांनी टॅरिफला एक आर्थिक आणि विदेशी धोरणासाठी ढाल म्हणून वापरले. ट्रम्प यांनी हे निर्णय अमेरिकेच्या आर्थिक सुरक्षेसाठी महत्त्वाचे असल्याचे म्हटले होते. टॅरिफशिवाय अमेरिका उद्ध्वस्त होईल, अशी भीतीही व्यक्त केली होती.
आणीबाणीसाठी बनवलेल्या संघीय कायद्याचा वापर करून डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील देशांना अतिरिक्ट टॅरिफ लादला होता. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी आणीबाणीच्या अधिकाराचा वापर करून अमेरिकेच्या व्यापारी भागीदारांवर व्यापक शुल्क लावणे हे बेकायदेशीर आहे, असे अमेरिकन सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. अमेरिका सुप्रीम कोर्टाचे कंजर्वेटिव मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्टस यांच्या खंडपीठाने ६-३ मतांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा आणीबाणीच्या अधिकारांचा वापर करून लावलेला टॅरिफचा निर्णय हा रद्दबातल ठरवला आहे.
दरम्यान, ९ न्यायाधीशांच्या या खंडपीठात न्यायमूर्ती सॅम्युअल अलिटो, क्लेरेन्स थॉमस आणि ब्रेट कॅव्हाना या ३ न्यायाधीशांनी या निर्णयाला असहमती दर्शविली तर ६ न्यायाधीशांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ लावणे हे बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.
अधिकाराच्या मर्यादांचे
राष्ट्राध्यक्षांकडून उल्लंघन
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर अतिरिक्त टॅरिफ लादून मनमानी सुरू केली होती. याचा अनेक देशांना मोठा फटका बसला. आता यावर अमेरिकन सुप्रीम कोर्टाने विविध देशांवर टॅरिफ लादताना ट्रम्प यांनी त्यांच्या अधिकारांच्या मर्यादांचे उल्लंघन केले आहे, असे सांगताना ट्रम्प यांना चांगलेच फैलावर घेतले.
माझा ब्लॅन बी तयार
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक अधिकार कायदाच्या अंतर्गत आयात होणा-या मालावर अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यांच्या या निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेवर फार वाईट परिणाम झाले होते. त्यांच्या या निर्णयाने प्रभावित झालेल्या काही व्यावसायिकांनी आणि अमेरिकेच्या १२ राज्यांनी कोर्टात धाव घेतली होती. आता यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर आपला प्लॅन बी तयार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटल्याचे समोर येत आहे.

