26.9 C
Latur
Thursday, January 22, 2026
Homeलातूरट्युशन एरियात पोलिसांची कारवाई; १६ जणांचा बंदोबस्त

ट्युशन एरियात पोलिसांची कारवाई; १६ जणांचा बंदोबस्त

लातूर : प्रतिनिधी
संध्याकाळ झाली की, ट्युशन एरियातील गल्ल्या विद्यार्थ्यांच्या गर्दीने फुलुन जातात. येथे विनाकारण उभे राहाणे, मुलींची छेड काढणे किंवा नुसतीच दशहत निर्माण करणे, यामुळे विद्यार्थी आणि पालकवर्गातून हळूहळू अस्वस्थता पसरली. याचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस दलाची मोठी फौज अचानक ट्युशन एरियात दाखल झाली. धडक मोहिमेत १६ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
ज्या गल्ल्यांमध्ये नेहमीच विनाकारण टाईमपास करणारे आणि गुंडगिरी ची भाषा करणारे उभे असायचे त्या गल्ल्यांमध्ये अचानक सायरनचे आवाज आणि खाकी वर्दी दिसू लागली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ही ऑपरेशन क्लीन स्वीप सुरु झाली आहे. एका कोप-यात, कॉलेजच्या भिंतीजवळ चार तरुण विनाकारण गर्दी करुन उभे होते. त्यांची चौकशी सुरु झाली. कागदपत्रे तपासली गेली, बोलण्यातला उद्धटणा जोखला गेला. दुस-या एका ठिकाणी, काही संशयीत व्यक्ती विद्यार्थ्यांमध्ये दहशत निर्माण करत असल्याचे आढळले.
पोलिसांनी प्रत्येक मुख्य रस्ता, गल्लीबोळ अत्यंत बारकाईने तपासला. ही केवळ तपासणी नव्हती तर शैक्षणिक परिसरासाठी एक संदेश होता. पहाटेपर्यंत हे काम सुरु होते. विनाकारण फिरणारे, विद्यार्थ्यांना त्रास देणारे, गुंडगिरीची प्रवृत्ती दाखवणारे जाळ्यात अडकले. त्यांच्यावर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. या धडक कारवाईने लातूरच्या ट्युशन एरियात शांतता पसरली. पोलिसांच्या या कारवाईमुळे बेताल वर्तणुक करणा-यांना स्पष्ट इशारा मिळाला. विद्यार्थी सुरक्षित तर शिक्षण सुरक्षित म्हणून कारवाई करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR