वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये नुकतीच झालेली भेट अत्यंत तणावपूर्ण आणि वादळी ठरली. रशियाविरुद्धच्या लढाईसाठी अमेरिकेकडून नवीन शस्त्रास्त्रांची अपेक्षा ठेवून आलेल्या झेलेंस्की यांना ट्रम्प यांनी शांततेचा आणि शरणागतीचा सल्ला दिला.
सुमारे २ तास चाललेल्या या बैठकीत अनेकदा जोरदार शाब्दिक खडाजंगी उडाली. ट्रम्प यांनी रागाने ओरडत आणि कठोर शब्दांत झेलेंस्की यांना ठणकावले की, युक्रेन युद्ध हरत आहे आणि त्यांनी रशियाच्या अटी मान्य करायला हव्यात. जर युक्रेनने रशियाचे म्हणणे ऐकले नाही, तर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात युक्रेनला पूर्णपणे नष्ट करण्याची क्षमता आहे, असे म्हणत ट्रम्प यांनी नकाशा बाजुला फेकून दिला. तसेच संपूर्ण डोनबास प्रदेश रशियाच्या ताब्यात देण्यास सांगितले.
काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी रशियाविरोधात धमकी देताना अमेरिकेची टॉमहॉक क्षेपणास्त्रे युक्रेनला देऊ, असे म्हटले होते. या अपेक्षेने झेलेन्स्की आले होते. परंतू, ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांची मागणी फेटाळून लावली. तसेच माझे लक्ष आता शांतता करारावर आहे, युक्रेनची लष्करी शक्ती वाढवण्यावर नाही, असे सांगितले.
युद्ध संपविण्याची हीच वेळ
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अद्यापही सुरूच आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संघर्ष संपवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याचवेळी, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. रशियासोबत सुरू असलेले युद्ध संपवण्याची ‘योग्य वेळ’ आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, त्यांनी आपल्या मित्रदेशांना मॉस्कोवर कूटनीतिक दबाव वाढवण्याचे आवाहनही केले आहे. सोमवारी एक्सवर एक पोस्ट करत झेलेन्स्की यांनी सांगितले की, आपण फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी अलीकडील घडामोडी आणि शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या कूटनीतिक प्रयत्नांवर चर्चा केली.
















