27.2 C
Latur
Saturday, March 7, 2026
Homeअंतरराष्ट्रीयट्रम्प टॅरिफचा पुन्हा दणका

ट्रम्प टॅरिफचा पुन्हा दणका

भारताच्या सौर उत्पादनांच्या आयातीवर तब्बल १२६ टक्के कर
ट्रम्प यांचा आक्रमक बाणा
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफचा निर्णय अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर ट्रम्प पुन्हा आक्रमक झाले असून, टॅरिफवाढीचा धडाका सुरूच ठेवला आहे. यानंतर ट्रम्प यांनी पहिल्यांदा सर्व देशांवर १० टक्के टॅरिफ लागू करत असल्याची घोषणा केली. यानंतर पुढे जात ट्रम्प यांनी ते १० वरून १५ टक्क्यांपर्यंत वाढवले. आता अमेरिकेने भारत, इंडोनेशिया आणि लाओस यासारख्या देशांमधील सौर उत्पादनांच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावले आहे. अमेरिकेने भारतीय सौर उत्पादनांवर १२६ टक्के टॅरिफ लादले. यामुळे या निर्णयाचा परिणाम सौर ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांवर झाला आहे.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने भारतातून आयात केल्या जाणा-या सौर उत्पादनांच्या आयातीवर १२६ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली. इंडोनेशियासाठी हे शुल्क ८६ टक्के १४३ टक्क्यांदरम्यान असेल. लाओससाठी हे शुल्क ८१ टक्के निर्धारीत करण्यात आले आहे. आयात शुल्काचे दर विदेशातील सब्सिडी लक्षात घेत तयार करण्यात आली आहेत. अमेरिकेच्या मते या देशातील निर्यातदार अमेरिकेमधील देशांतर्गत सौर ऊर्जा उत्पादकांच्या तुलनेत कमी किमतीवर उत्पादन निर्यात करण्यास परवानगी मिळते. ट्रम्प यांच्या प्रशासनाकडून अधिक टॅरिफ लावण्याचे कारण म्हणजे देशांतर्गत सौर ऊर्जा उत्पादकांना अधिक लाभ पोहोचवणे आहे.

२० फेब्रुवारीला अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने डोनाल्ड ट्रम्प यांनी कायद्याचा गैरवापर करत टॅरिफ लादल्याचा निर्णय दिला होता. ट्रम्प यांची टॅरिफ रद्द केली होती. मात्र, ट्रम्प यांनी त्यानंतर कलम १२२ चा वापर करत जागतिक टॅरिफ १५ टक्के केले आहे. हे टॅरिफ १५० दिवस कायम असेल. त्यानंतर टॅरिफ पुढे ठेवण्यासाठी अमेरिकन काँग्रेसची मान्यता लागेल.

भारतीय निर्यातीला
बसू शकतो फटका
अमेरिकेकडून भारतीय सौर उत्पादनांवर १२६ टक्के टॅरिफ लादण्यात आल्याने भारतीय निर्यातीवर परिणाम होईल. वाणिज्य मंत्रालयाची आकडेवारी पाहता २०२४ मध्ये भारताने अमेरिकेला ७९२.६ दशलक्ष डॉलरची निर्यात केली होती. गेल्या काही दशकांत भारताची सौर ऊर्जा निर्यात वाढली होती. ट्रम्प यांनी ज्या ३ देशांना टार्गेट केले, त्या देशांकडून अमेरिकेने ४.५ अब्ज डॉलर्सची सौर उत्पादनांची आयात केली होती.

२०२५ मध्ये ३ देशांतून
एकूण ५७ टक्के आयात
एका अहवालानुसार २०२५ च्या पहिल्या ६ महिन्यांत अमेरिकन सौर ऊर्जा उत्पादनांच्या एकूण आयातीपैकी ५७ टक्के आयात भारत, इंडोनेशिया आणि लाओसमधून केली होती. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी या तीन देशांवर टॅरिफ लादण्याचा घेतलेला निर्णय धक्कादायक मानला जात आहे.

उत्पादक कंपन्यांच्या
शेअरमध्ये घसरण
भारतीय शेअर बाजारात सौर ऊर्जा उपकरणांची निर्मिती करणा-या उत्पादक कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली. वारी एनर्जीजच्या शेअरमध्ये ११ टक्के, प्रीमिअर एनर्जीजच्या शेअरमध्ये १४.२ टक्के आणि विक्रम सोलारच्या शेअरमध्ये ७.८ टक्के घसरण झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR