आणखी शुल्क वाढविण्याचे संकेत, रशियाच्या संबंधावरून टीका
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेलाच्या खरेदी-विक्रीवरून भारतावर पुन्हा शुल्क वाढवण्याची धमकी दिली आहे. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात स्वस्तात तेल खरेदी करत आहे आणि ते खुल्या बाजारात मोठ्या नफ्यात विकत आहे. त्यामुळे भारताकडून आणखी पैसा वसूल करू, असा इशारा देत भारतावर आणखी आयात शुल्क वाढविण्याचे संकेत दिले. या निर्णयामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता आहे.
ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत आहे. इतकेच नव्हे तर ते खुल्या बाजारात मोठ्या नफ्यात विकत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. युक्रेनमध्ये रशियन युद्ध मशीनद्वारे किती लोक मारले जात आहेत, याची त्यांना पर्वा नाही. यामुळे मी भारतावर मोठ्या प्रमाणात शुल्क वाढविणार आहे.
यापूर्वी ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के शुल्क आणि रशियन कच्चे तेल आणि लष्करी उपकरणे खरेदी केल्याबद्दल दंड ठोठावला होता. मात्र, त्यांनी शुल्क किती वाढवणार, हे स्पष्ट केले नाही. गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी भारत-रशिया संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. नवी दिल्ली मॉस्कोबरोबर किती व्यापार करते, याची आपल्याला पर्वा नाही, असे ते म्हणाले होते. मागील आठवड्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताच्या उच्च शुल्क आणि रशियाबरोबरचे लष्करी आणि ऊर्जा संबंध पाहता भारतीय वस्तूंवर २५ टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केली होती. १ ऑगस्टपासून हे शुल्क लागू झाले आहे.
भारताचे हित जपणार,
मोदी सरकारची प्रतिक्रिया
यावर भारत सरकारने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. शुल्क वाढीच्या परिणामांचा अभ्यास करत असून, भारताचे हित जपण्यासाठी आवश्यक ती पाऊले उचलली जातील, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. ३० जुलै रोजी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने यासंबंधी एक निवेदन जारी केले होते.

