लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागाकडून सन २०२०-२१ या वर्षातील खराब झालेली स्मृतीचिन्हे (ट्रॉफी) दुरुस्त करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, याच कालावधीतील राज्यस्तरीय ऊर्जा संवर्धन पुरस्कारांचे वितरण अद्यापही झाले नसल्याने पुरस्कार विजेते आणि ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
विशेष म्हणजे, गेल्या ५ वर्षांत राज्यस्तरीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले नाही. परिणामी, निवड झालेल्या अनेक पुरस्कार विजेत्यांना अद्याप सन्मान स्वीकारण्याची संधी मिळालेली नाही. या विलंबामुळे काही पुरस्कार विजेते शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत, तर काही अधिका-यांच्या राज्यातील विविध शहरांमध्ये बदल्या झाल्या आहेत. काही अधिकारी पुढील काही महिन्यांत सेवानिवृत्त होण्याच्या मार्गावर आहेत. ऊर्जा संवर्धन आणि ऊर्जा कार्यक्षमतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या उद्योग, संस्था, शासकीय कार्यालये आणि व्यक्तींना दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. मात्र, २०२०-२१ नंतर पुरस्कार वितरण प्रक्रिया रखडल्याने संबंधितांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. शासनाकडून ट्रॉफी दुरुस्तीसाठी निविदा काढली जात असताना, प्रत्यक्ष पुरस्कार वितरणाबाबत कोणतीही ठोस घोषणा करण्यात आलेली नाही.
ऊर्जा क्षेत्रातील जाणकारांच्या मते, ऊर्जा संवर्धनासाठी उल्लेखनीय काम करणा-यांचा वेळेत गौरव होणे आवश्यक आहे. पाच वर्षांचा विलंब हा पुरस्कारांच्या उद्देशालाच हरताळ फासणारा आहे. शासनाने तातडीने पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करून प्रलंबित पुरस्कारांचे वितरण करावे. दरम्यान, ऊर्जा संवर्धन क्षेत्रातील विविध संस्था आणि पुरस्कार विजेत्यांनी महाराष्ट्र शासन व संबंधित विभागाकडे लवकरात लवकर पुरस्कार वितरणाचा निर्णय जाहीर करण्याची मागणी केली आहे.
















